टाळेबंदीनंतर दोन महिन्यांनी सुरू झालेल्या विमानतळावर नेहमीच्या उत्साहाचा अभाव सोमवारी ठसणारा होता. प्रतिष्ठेच्या विमानप्रवासाची जागा अगतिकतेने घेतल्याचे चित्र दिसत होते. त्यात रद्द झालेल्या विमानांनी प्रवाशांच्या मन:स्तापात भर घातली.

छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ, मुंबई, टर्मिनल २ या ठिकाणाला असलेले वलय, प्रतिष्ठा हरवली होती. हजारो रुपये खर्चून विमान प्रवासाला निघालेल्या प्रवाशांच्या दिमाखाची जागा अगतिकतेने घेतल्याचे दिसत होते.

एकाला नटून थटून सोडायला येणारे पाच दहा कुटुंबीय, गळाभेटी घेऊन चालणारे निरोप समारंभ या विमानतळावरील सरावाच्या दृश्याची कमी ठसणारी होती. सेल्फी, चेक इन ची समाज माध्यमांवर माहिती देण्याच्या उत्साहाच्या जागी फक्त अनामिक भीती होती. वेषभूषा मिरवण्याऐवजी नखशिखांत सुरक्षा साधन लेऊन फिरणारे तरुण अधिक होते. विमान प्रवासाच्या प्रक्रियेला सरावलेले, नवखे यांची रांग प्रस्थानासाठी सकाळपासून लागली होती. वातावरणातील तणावामुळे सारवलेलेही भांबावून गेले होते. विमानतळाच्या प्रवेशदारावर प्रत्येकाचे तापमान बघून प्रवेश दिला जात होता. एखाद्या प्रवाशाला वेळ लागल्यानंतर ‘तापमान जास्त दिसले तर जाऊ देणार नाहीत का?‘ या प्रश्नासह भीती ओठावर येत होती.

सामान नेण्यावर असलेल्या निर्बंधामुळे ट्रॉलीही उपलब्ध करून देण्यात आल्या नव्हत्या. विमानात खाणेही देण्यात येणार नव्हते. विमानतळावरील खाद्यपदार्थांची दुकाने, हॉटेल्स बंद होती. त्यामुळे जड सामान सावरत धावणारे प्रवासी, एखाद्या कोपऱ्यात डबा खाणारे किंवा बिस्किटपुडय़ावर पोटपूजा करणारे प्रवासी हे एरवी रेल्वेस्थानक, बस स्थानकावर दिसणारे दृश्य अभावितपणे विमानतळावर नजरेस पडत होते. तिकीटाच्या रकमेत मिळणारी प्रत्येक सुविधा हक्काने घेणारे प्रवाशांची सुविधा नकोत पण घरी जाऊ द्या या अगतिक भावनेने एरवीचा विमानतळावरील वातावरणातील भपका संपवला होता.

विमाने रद्द, प्रवाशांना मनस्ताप

काही विमाने रद्द झाल्यामुळे प्रवाशांना मन:स्तापाला सामोरे जावे लागले. आयत्यावेळी विमान रद्द झाल्यामुळे आता पुन्हा कुठे जायचे असा प्रश्न प्रवाशांना सतावत होता. वंदे भारत योजनेमध्ये सिंगापूरहून हैदराबादला जाऊ इच्छिणाऱ्या विजयलक्ष्मी यांना थेट विमान मिळाले नाही. १४ दिवसांपूर्वी त्या मुंबईत पोहोचल्या. पनवेल येथे एका हॉटेलमध्ये विलागीकरणाचा कालावधी पूर्ण करून त्या सोमवारी हैदराबादला निघाल्या. मात्र त्यांचे विमान रद्द झाले. दुसरे कोणतेही विमान नसल्यामुळे त्या विमानतळावरच अडकल्या. ‘माझा हॉटेलचा खर्च ४० हजार रुपये झाला. साडेचार हजार रुपये चाचणीचे. विमान तळावर पोहोचण्यासाठी अडीच हजार रुपये. आता विमान रद्द झाल्यावर मी कुठे जायचे. हॉटेल आता अधिक रक्कम मागत आहे. आता खर्च करण्याची क्षमताही राहिलेली नाही,‘ असे त्यांनी सांगितले. गुवाहटीला निघाल्या अफसना सुलतान हिचे दिल्लीचे विमानही रद्द झाले. ‘मी इंटर्नशिपसाठी मुंबईत आले होते आणि इकडेच अडकले. सकाळी ८ वाजता विमानतळावर आले. बारा वाजेपर्यंत काहीच सूचना दिली नाही. नंतर विमान रद्द झाल्याचे सांगितले. आता रात्रीच्या विमानाने जाण्याची सोय केली आहे. मंगळवारी पहाटे दिल्लीतून गुवाहटीच्या विमानात बसणार आणि सायंकाळी पोहोचणार. इथे खण्या पिण्याचीही सुविधा नाही,‘ अशी तक्रार अफसनाने केली.

टॅक्सीसाठी हजारो रुपये

मुंबई किंवा उपनगरातून विमानतळावर येण्यासाठी टॅक्सी, कॅब चालक हजारो रुपये आकारत होते. शहरांतर्गत वाहतूक सुविधा नसल्यामुळे अनेकजण विमानतळावर अडकले होते. प्रवाशांना सोडायला आलेले टॅक्सीचालक आलेल्या प्रवाशांना घेऊन जाण्यासाठी दोन ते चार हजार रुपये मागत होते.

प्रस्थानासाठी गर्दी, आगमन ओस

प्रस्थानासाठी प्रवाशांच्या रांगा होत्या. आगमनाच्या ठिकाणी मात्र शुकशुकाट होता. पाहुण्यांचे स्वागत करण्यासाठीची एरवीची गर्दी, आनंदाचे वातावरण याचा मागमूसही नव्हता. तुरळक येणारे प्रवासी घरी विलागीकरणात जाण्यासाठी झटपट मार्गस्थ होत होते.