एकीकडे मुंबईमधील करोनाच्या संसर्गावर नियंत्रण मिळविण्यात येत असल्याचा दावा पालिकेकडून करण्यात येत असला तरी सोमवारी दिवसभरात सुमारे एक हजार १७४ जणांना करोनाची बाधा झाल्याचे स्पष्ट झाले आहे. करोनामुळे सोमवारी ४७ जणांचा मृत्यू झाला.

मुंबई जिल्ह्य़ातील करोना रुग्ण बरे होण्याचा दर ७० टक्क्य़ांवर पोहोचला असून करोना रुग्ण वाढीचा दर १.३६ टक्क्य़ांवर घसरला आहे. त्यामुळे पुण्याप्रमाणे मुंबई कुलूपबंद करावी लागणार नाही, असा दावा करण्यात येत आहे. मात्र असे असले तरी मुंबईत सातत्याने नवे रुग्ण सापडण्याची साखळी अद्याप तुटलेली नाही. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढत असले तरी सोमवारी विविध रुग्णालयांमध्ये ९३४ करोना संशयीतांना दाखल करण्यात आले असून आतापर्यंत विविध रुग्णालयांमध्ये दाखल केलेल्या करोना संशयीत रुग्णांची संख्या ६५ हजार ५५० वर पोहोचली आहे. तर सोमवारी एक हजार १७४ नवे रुग्ण सापडले आणि मुंबईतील करोनाबाधित रुग्णांची संख्या ९३ हजार ८९४ वर पोहोचली. आतापर्यंत ६५ हजार ६२२ रुग्ण बरे झाले असून त्यांना रुग्णालयातून घरी पाठविण्यात आले आहे. तर पाच हजार ३३२ मुंबईकरांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे.

राज्यात २४ तासांत ६४९७ बाधित 

राज्यात दोन दिवस रोज सरासरी आठ  हजारांपेक्षा अधिक करोना रुग्णांची नोंद झाल्यानंतर मागील २४ तासांत ६४९७ नवे रुग्ण आढळले आहेत. याच काळात १९३ जणांचा मृत्यू झाला. राज्यातील रुग्णांची एकू ण संख्या २ लाख ६० हजार झाली असून, मृतांचा आकडा १०,४८२ झाला.