मुंबईत मोठय़ा संख्येने करोनाचे रुग्ण सापडण्याचे प्रमाण अद्यापही कमी झालेले नाही. शुक्रवारी २२६७ नवीन रुग्णांची नोंद झाली असून ५२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृतांची संख्याही गेल्या आठवडय़ात वाढलेली असली तरी एकूण मृत्यूदर ४.६ वर आहे. रुग्ण दुपटीचा कालावधी दोन महिन्यांपेक्षाही कमी आहे. तर उपचाराधीन रुग्णांची संख्या ३४ हजारांच्यापुढे गेली आहे.

मुंबईतील रुग्णवाढीचा दर १.२५ टक्कय़ांवर गेला आहे. तर बारा विभागांचा रुग्णवाढीचा दर हा सरासरीपेक्षा अधिक आहे. या आठवडय़ात वांद्रे पश्चिम भागातील रुग्णवाढीचा दर सर्वात जास्त म्हणजे १.७७ टक्के इतका आहे. या भागात आतापर्यंत दररोज सरासरी ७० रुग्ण सापडत होते. त्यांची संख्या अचानक सरासरी १०० वर गेली आहे.  त्याखालोखाल बोरिवली, अंधेरी पश्चिम, दहिसर, कांदिवली, मुलुंड, ग्रँटरोड, गोरेगाव या भागात रुग्ण वेगाने वाढत आहेत. शुक्रवारी २२६७ नवीन रुग्णांची नोंद झाल्यामुळे एकूण बाधितांचा आकडा १ लाख ८० हजार ५४२ वर गेला आहे.

रुग्णदुपटीचा कालावधीही घसरला असून ५६ दिवसांवर अर्थात दोन महिन्यांपेक्षाही कमी दिवसांचा आहे.  वांद्रे पश्चिममध्ये हाच कालावधी अवघा सव्वा महिन्यावर आला आहे. मुंबईत पाच विभाग असे आहेत जिथे दीड महिन्यातच रुग्णसंख्या दुप्पट होते आहे. त्यात बोरिवली, मालाड, कांदिवली, अंधेरी पश्चिम या भागांचाही समावेश आहे.

रुग्णांची संख्या वेगाने वाढत असल्यामुळे रुग्णमुक्त होण्याचा दरही घसरला आहे. शुक्रवारी एका दिवसात ९२५ रुग्ण बरे होऊन घरी गेले. आतापर्यंत १ लाख ३७ हजार ६६४ रुग्ण म्हणजेच ७६ टक्के रुग्ण करोनामुक्त झाले आहेत. हेच प्रमाण गेल्या महिन्यात ८० टक्कय़ांच्यापुढे गेले होते. उपचाराधीन रुग्णांची संख्या ३४,१३६ वर गेली आहे.