पालिकेने मुंबईतील चाचण्यांची संख्या वाढवली असून सलग तीन दिवस १५ हजारापर्यंत दैनंदिन चाचण्या करण्यात येत आहेत. त्यामुळे मोठय़ा प्रमाणावर रुग्णांची नोंद होत आहे. शनिवारी २३२१ रुग्णांची नोंद झाली असून ४२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

मुंबईतील एकूण चाचण्यांची संख्या ९ लाखांच्या पुढे गेली आहे. चाचण्यांची संख्या वाढवण्याचे लक्ष्य महापालिकेने सर्व विभाग कार्यालयांना दिले होते. त्यानुसार मुंबईत मोठय़ा संख्येने चाचण्या केल्या जात आहेत.

दर दिवशी तब्बल १५ हजार चाचण्या केल्या जात आहेत. त्यात प्रतिजन चाचण्यांचे प्रमाणही मोठे आहे. शनिवापर्यंत मुंबईत ९,०३,१०१ चाचण्या करण्यात आल्या.

७८ टक्के रुग्ण करोनामुक्त

आतापर्यंत १ लाख ३० हजार १६ रुग्ण म्हणजेच ७८ टक्के रुग्ण करोनामुक्त झाले आहेत. तर २९,१३१ रुग्ण उपचार घेत आहेत. शनिवारी ४२ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली. मृतांची एकूण संख्या ८१०६ वर गेली आहे.

गोरेगावात रुग्णवाढ

मुंबईतील रुग्णवाढीचा वेग १.२ टक्कय़ांवर गेला आहे. तर गेल्या आठवडय़ात सर्वात वेगाने रुग्णवाढ झालेल्या विभागांमध्ये गोरेगावचा समावेश आहे. मुंबईत आतापर्यंत गोरेगावमध्ये रुग्णसंख्या नियंत्रणात होती. मात्र सध्या येथील रुग्णवाढीचा दर सर्वात जास्त म्हणजे १.६४ टक्के  आहे. या भागात एकूण रुग्णांची संख्या ५८११ इतकी असून गेल्या आठवडय़ाभरात इथे दररोज सरासरी ९० रुग्णांची नोंद होते आहे.