मशीद बंदर, भायखळा, परळ, घाटकोपर, मुलुंड, डोंबिवली, बेलापूर, पनवेलमध्ये सर्वाधिक कॅमेरा

गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पश्चिम रेल्वेपाठोपाठ मध्य रेल्वे मुंबई विभागातही (सीएसएमटी ते कसारा, खोपोली, लोणावळापर्यंत)२,४२५ अतिरिक्त सीसीटिव्ही कॅमेरा बसवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे प्रवाशांची सुरक्षा अधिक मजबूत होणार आहे. वर्षभरात हे कॅमेरा बसविले जातील, अशी माहिती मध्य रेल्वे सुरक्षा दलाने दिली. मस्जिद स्थानक, भायखळा, परळ, घाटकोपर, मुलुंड, दिवा, डोंबिवली, खापोली, बेलापूर, पनवेल स्थानकात  सर्वाधिक कॅमेरा बसवण्यात येणार आहेत.

देशभरातील रेल्वे स्थानकांची सुरक्षा व्यवस्था मजबूत करण्यासाठी एकात्मिक सुरक्षा आणि निर्भया निधीअंतर्गत विविध सुरक्षा उपाय केले जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणून पश्चिम व मध्य रेल्वेच्या मुंबई विभागातील उपनगरीय स्थानके व मेल-एक्सप्रेसचा थांबा असलेल्या स्थानकांमध्ये सीसीटिव्ही कॅमेरा बसवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पश्चिम रेल्वेच्या मुंबई विभागात अतिरिक्त १,७०० कॅमेरा बसविले जातील. आता त्यापाठोपाठ निर्भया निधीअंतर्गत मध्य रेल्वे प्रशासनानेही सर्व स्थानकांवर अतिरिक्त कॅमेरा बसवण्याची तयारी दर्शविली आहे. सध्या तीन हजारपेक्षा जास्त कॅमेरा मुंबई विभातील रेल्वे स्थानकामध्ये बसविले आहेत. त्यात ७४ स्थानकात आणखी २,४२५ कॅमेरांची भर पडणार असल्याचे सांगण्यात आले. यात मस्जिद स्थानकातच ३९ सीसीटिव्ही बसविले जाणार असून सॅन्डहर्स्ट रोड मुख्य आणि हार्बर मार्गावर प्रत्येकी ४० कॅमेरा बसवण्याचे नियोजन केले आहे. त्यापाठोपाठ भायखळा, परळ, घाटकोपर, मुलुंम्ड, दिवा, कोपर, डोंबिवली, कसारा, इगतपुरी, खोपोली, वडाळा जुईनगर, नेरुळ, बेलापूर, पनवेल स्थानकात प्रत्येकी ४० व त्यापेक्षा जास्त अतिरिक्त कॅमेरांचा समावेश केला आहे.

* मध्य रेल्वेवरील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, दादर, कुर्ला, ठाणे स्थानकात सध्याच्या घडीला प्रत्येकी २०० पेक्षा जास्त कॅमेरा आहेत. कॅमेरांची संख्या पाहता या स्थानकांचा निर्भया अंतर्गत समावेश करण्यात आलेला नाही.

निर्भया अंतर्गत २,४०० सीसीटिव्ही कॅमेरा बसविले जाणार आहेत. त्यांचा दर्जा उत्तम असणार आहे.

के.के. अश्रफ, वरिष्ठ विभागीय सुरक्षा आयुक्त, मध्य रेल्वे