दीड हजार कोटींचा खर्च; पावसाळय़ात अर्धवट राहिलेल्या रस्त्यांसह २०२ किमीचे नवे रस्ते

शहरातील एकूण १९०० किलोमीटर लांबीच्या रस्त्यांपैकी ५०७ किमी लांबीच्या म्हणजे सुमारे २५ टक्के रस्त्यांची कामे येत्या ऑक्टोबरपासून टप्प्याटप्प्याने हाती घेतली जाणार आहेत. यापैकी ३०५ किमीच्या रस्त्यांचे काम पावसाळय़ामुळे पूर्ण होऊ शकले नव्हते, असे पालिकेने म्हटले आहे. मात्र, गेल्या दोन वर्षांत ५५२ किमी लांबीच्या रस्त्यांची कामे पूर्ण झाल्याचा दावाही पालिकेने केला आहे.

दरवर्षी पावसाळ्यात रस्त्यांची कामे थांबवली जातात व १ ऑक्टोबरपासून रस्तेकामांना पुन्हा सुरुवात होते. मे महिन्यात उशिरा हाती घेतलेल्या रस्त्यांची कामे वेळीच थांबवली न गेल्याने या वेळी पहिल्याच पावसात अनेक रस्त्यांची चाळण झाल्याचे पाहायला मिळाले. आता १ ऑक्टोबरपासून या रस्त्यांचीही कामे टप्प्याटप्प्याने हाती घेतली जाणार आहे. महानगरपालिकेच्या रस्ते विभागाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार पावसाळ्यापूर्वी हाती घेतलेल्या मात्र पूर्ण न झालेल्या ३०५ किलोमीटर लांबीच्या ७१९ रस्त्यांचे काम ऑक्टोबरपासून हाती घेण्यात येईल. यापैकी ६६ किलोमीटरच्या रस्त्यांचे केवळ पृष्ठीकरण केले जाईल. मात्र या रस्त्यांच्या कामासाठी वाहतूक विभागाकडून अद्याप परवानगी मिळालेली नाही. शहरात मेट्रोच्या कामांमुळे वाहतूक कोंडी होत आहे. त्यामुळे या रस्त्यांच्या कामांना टप्प्याटप्प्याने परवानगी दिली जाण्याची शक्यता आहे. याशिवाय पालिका या वर्षी आणखी २०२ किलोमीटरचे ६२४ रस्ते तयार करण्यासाठी निविदा प्रक्रिया राबवत आहे, अशी माहिती रस्ते विभागाचे प्रमुख अभियंता विनोद चिठोरे यांनी दिली. एखाद्या रस्त्याचा काही भाग किंवा दुभाजकाच्या दुतर्फा असलेल्या रस्त्याचा अर्धा भाग हा प्रकल्प रस्त्यात, तर दुसरा हा पृष्ठीकरणाच्या कामात समाविष्ट असू शकतो.

दोन वर्षांत ५५२ किमीचे रस्ते

१ ऑक्टोबर २०१६ ते ३१ मे २०१८ या काळात ५५२ किमी लांबीच्या रस्त्यांची कामे पूर्ण झाल्याचा दावा महानगरपालिकेने केला आहे. यात ३४७ किमी लांबीचे रस्ते नव्याने तयार करण्यात आले, तर २०५ किमी रस्त्यांचा पृष्ठभाग दुरुस्त करण्यात आला. याव्यतिरिक्त २ लाख ८८ हजार चौरस मीटर क्षेत्रफळाच्या जंक्शन भागाचे कामही पूर्ण करण्यात आले. प्रकल्प रस्त्यांसाठी दोषदायित्व कालावधी तीन वर्षांचा, तर पृष्ठीकरण केलेल्या रस्त्यांचा दोषदायित्व कालावधी दोन वर्षांचा आहे. या काळात रस्ते खराब झाल्यास संबंधित कंत्राटदाराला ते दुरुस्त करून द्यावे लागतात.