11 August 2020

News Flash

मुंबईत आणखी ५३० करोना मृत्यू लपविले

सोमवापर्यंत सर्व मृतांची माहिती देण्याचे आयुक्तांचे आदेश

संग्रहित छायाचित्र

संदीप आचार्य

मुंबईत ८६२ करोना मृत्यूंची माहिती लपविल्याचा प्रकार ताजा असतानाच अशी आणखी ५३० प्रकरणे उघडकीस आली आहेत. याची गंभीर दखल घेत पालिका आयुक्त इक्बाल सिंग चहल यांनी सर्व अधिष्ठाता, वैद्यकीय अधीक्षक तसेच खाजगी रुग्णालयांच्या प्रमुखांना त्यांच्याकडील सर्व करोना मृत्यूंची माहिती सोमवापर्यंत सादर करण्याचे आदेश दिले आहेत.

आरोग्य विभागाकडून सादर होणाऱ्या मुंबईतील करोना मृतांच्या आकडेवारीत गेल्या काही दिवसांपासून ‘४८ तासांतील करोना मृत्यू’ आणि ‘मागील करोना मृत्यू’ असे दोन स्वतंत्र संदर्भ दिले जातात. मुंबईतील ४५१ करोना मृत्यू जाहीर केले नसल्याचे वृत्त सर्वप्रथम ‘लोकसत्ता’ने उघडकीस आणल्यानंतर मावळते मुख्य सचिव अजोय मेहता यांनी ‘आम्हाला एकही करोना मृत्यू लपवायचा नाही. दोन दिवसांत मुंबईसह राज्यातील सर्व शिल्लक करोना मृत्यू जाहीर केले जातील’, असे स्पष्ट केले होते. त्यानुसार १६ जून रोजी राज्य सरकारने एका प्रसिद्ध पत्रकाद्वारे राज्यातील १,३२८ व मुंबईतील ८६२ करोना मृत्यू जाहीर केले.

मात्र पालिकेच्या आयुक्त व अतिरिक्त आयुक्तांनी घेतलेल्या आढाव्यात विभागस्तरावर घरात झालेले, तसेच छोटय़ा नर्सिग होम्समधील अनेक करोना मृत्यूंची माहितीच ‘डेथ ऑडिट कमिटी’पुढे आली नसल्याचे उघड झाले. यामुळे पालिकेच्या ‘एपिडेमिक सेल’च्या माध्यमातून अशा करोना मृत्यूंची माहिती गोळा करण्यास सुरुवात केली. या शोधमोहिमेत नव्याने ५३० करोना मृत्यू हाती लागले असले तरी पालिकेच्या शीव, नायर, केईएमसह अन्य रुग्णालयांमधील करोना मृत्यूंची माहिती अद्यापि पूर्णपणे हाती आलेली नसल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले.

आयुक्त चहल यांनी बोलावलेल्या शुक्रवारच्या बैठकीत सर्व अतिरिक्त आयुक्त, सहआयुक्त, सर्व वैद्यकीय महाविद्यालयांचे अधिष्ठाता तसेच अधीक्षक आणि टास्क फोर्सचे प्रमुख डॉ. संजय ओक, वैद्यकीय शिक्षण संचालक डॉ. तात्याराव लहाने व टास्क फोर्सचे सदस्य डॉ. शशांक जोशी आदी उपस्थित होते. या बैठकीत २० मे ते २३ मे या कालावधीत झालेल्या दैनंदिन करोना मृत्यूंच्या माहितीबरोबर केईएम, शीव व नायर सारख्या रुग्णालयातून एप्रिल व मेमधील करोना मृत्यूंची माहिती दिली गेल्याचे संबंधितांनी स्पष्ट केल्यानंतर कोणत्याही परिस्थितीत सोमवारपूर्वी सर्व जुने करोना मृत्यूंची माहिती समोर आणण्याचे आदेश आयुक्त इक्बाल सिंग चहेल यांनी दिले. तसेच सोमवारनंतर एकही जुना मृत्यू पुढे आल्यास संबंधितांवर कारवाई केली जाईल, असेही आयुक्त चहेल यांनी स्पष्ट केले.

मुंबईतील २४ विभागांत घरात झालेल्या करोना मृत्यूंची संख्या विभागनिहाय चार-पाच मृत्यूंपेक्षा जास्त नसून रुग्णालयांमधूनच अजूनही मृत्यूंची माहिती योग्य प्रकारे मिळालेली नसल्याचे बैठकीत दिसून आव्याचे एका ज्येष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. याबाबत आयुक्त चहल यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, मात्र संपर्क होऊ शकला नाही.

कारवाईचा इशारा : मुंबईतील सर्व मृत्यूंची माहिती हाती आल्याशिवाय नेमकी मृत्यूंची कारणमीमांसा करण्यातही अडचणी येत आहेत. तसेच मृत्यूदर कमी करण्यासाठी करावयाच्या उपाययोजनांची आखणी करण्याबाबत काही प्रश्न निर्माण होत असल्याकडे अधिकाऱ्याने लक्ष वेधले. त्यामुळे सोमवार २९ जूनपर्यंत कोणत्याही परिस्थितीत सर्व करोना मृत्यूंची माहिती समोर आणा अन्यथा कारवाईला तयार राहा असे आयुक्तांनी सांगितले. तसेच त्यानंतर दर ४८ तासांत सर्व करोना मृत्यूंची माहिती जमा झालीच पाहिजे, असेही आयुक्त चहल यांनी स्पष्ट केले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 27, 2020 12:11 am

Web Title: another 530 corona deaths were hidden in mumbai abn 97
टॅग Coronavirus
Next Stories
1 मोदी सरकारची चीनसमोर शरणागती
2 वेतनकपातीमुळे एसटी कर्मचाऱ्यांची आर्थिक कोंडी
3 उमेदवारी देताना कायद्यातील तरतुदीकडे दुर्लक्ष
Just Now!
X