विरारमधील आयसीआयसीआय बॅंकेतील महिला व्यवस्थापिकेची हत्या करून सव्वा दोन कोटींची लूट करणारा आरोपी अनिल दुबे याने नायगाव मधील ॲक्सिस बॅंकेतही २६ लाखांचा अपहार केल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी वालीव पोलीस ठाण्यात दुबेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गुरूवार २९ जुलै रोजी रात्री विरार पूर्वेच्या आयसीआयसीआय बॅंकेत लुटीची घटना घडली होती. बॅंकेच्या माजी व्यवस्थापक असलेल्या अनिल दुबे याने बॅंकेतील महिला व्यवस्थापक योगिता वर्तक-चौधरी आणि रोखपाल श्रध्दा देवरूखकर यांच्यावर चाकूने प्राणघातक हल्ला करून बॅंकेतील सव्वा दोन कोटी रुपयांचे सोने लुटून नेले होते. मात्र नागरिकांच्या सतर्कतेमुळे तो पकडला गेला. बॅंक लुटीचा प्रयत्न जरी फसला असला तरी या हल्ल्यात योगिता वर्तक- चौधरी यांचा मृत्यू झाला होता. आरोपी दुबे नायगावच्या ॲक्सिस बॅंकेत व्यवस्थापक म्हणून काम करत होता. या घटनेपूर्वी त्याने एक्सिस बॅंकेतील २६ लाख ८४ हजार रुपयांचा अपहार केल्याचे उघडकीस आले आहे. आयसीआयसीआय बॅंक लुटण्याच्या एक दिवस आधी म्हणजे २८ जुलै रोजी त्याने नायगाव येथील ॲक्सिस बॅंकेतील २८ लाख रुपये लंपास केले होते. याबाबत बॅंकेने वालीव पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर दुबे याच्यावर फसवणूक आणि अपहार केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आयसीआयसीआय बॅंक लूट प्रकरणात सध्या दुबे विरार पोलिसांच्या ताब्यात आहे. शनिवारी दुबे याच्या नालासोपारा येथील घराची झडती घेण्यात आली. त्यात बॅंकेशी संबंधित महत्वपूर्ण कागदपत्रे जप्त करण्यात आली आहेत.