अकरावीची प्रवेश प्रक्रिया यंदा जवळपास महिन्याभराने लांबली असून आता प्रथम येणाऱ्यास प्राधान्य तत्त्वावर अजून एक फेरी होणार आहे. त्यामुळे १७ सप्टेंबपर्यंत चालणारी ही प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर नव्याने प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचा अवघ्या १५ दिवसांत संपूर्ण सत्राचा अभ्यासक्रम आणि प्रात्यक्षिके पूर्ण करावी लागणार आहेत.

पाऊस, आरक्षणावरून अस्पष्टता यामुळे अकरावीची प्रवेश प्रक्रिया यंदा जवळपास महिन्याभराने लांबली आहे. तीन नियमित फेऱ्या, एक विशेष फेरी, एक प्रथम येणाऱ्यास प्राधान्य फेरी यानंतर आता प्रथम येणाऱ्यास प्राधान्य तत्त्वावरील अजून एक फेरी घेण्याचे प्रवेश समितीने निश्चित केले आहे. दोन टप्प्यांमध्ये होणारी ही फेरी १७ सप्टेंबरला संपणार आहे. आतापर्यंत प्रवेश न घेतलेले, प्रवेश न मिळालेले, प्रवेश रद्द केलेले आणि दहावीच्या पुनर्परीक्षेत उत्तीर्ण झालेले, एटीकेटी मिळालेले विद्यार्थी या फेरीत प्रवेश घेऊ शकणार आहेत. या विद्यार्थ्यांचा आतापर्यंत बुडालेला अभ्यास, प्रात्यक्षिके शिक्षकांनी भरून काढावीत अशा सूचना शिक्षण विभागाने दिल्या आहेत. मात्र १७ सप्टेंबरनंतर सर्व अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी शिक्षकांच्या हाती जेमतेम १५ ते २० दिवस आहेत.

प्रवेशाचे वेळापत्रक

* ३१ ऑगस्ट (सकाळी १० ते सायं ४)- प्रवेश रद्द करता येतील

* ३ ते ७ सप्टेंबर- प्रवेश अर्ज भरता येतील

* ७ सप्टेंबर (सायं ५)- पहिल्या गटातील (६० टक्क्यांपेक्षा अधिक गुण) विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी रिक्त जागांचे तपशील जाहीर होणार

* ९ सप्टेंबर (सकाळी १० ते सायं ५)- पहिल्या गटातील विद्यार्थ्यांना प्रवेश घेता येतील

* ९ सप्टेंबर (सकाळी १० ते सायं ५) आणि ११ सप्टेंबर (सकाळी १० ते दुपारी १)- मिळालेल्या महाविद्यालयात प्रवेश निश्चित करता येणार

* ११ सप्टेंबर (सायं ५)- दुसऱ्या गटातील विद्यार्थ्यांसाठी (३५ टक्क्यांपेक्षा अधिक गुण) रिक्त जागांचे तपशील जाहीर होणार

* १३ सप्टेंबर (सकाळी १० ते सायं ५)- दुसऱ्या गटातील विद्यार्थ्यांना प्रवेश घेता येईल

* १३ सप्टेंबर (सकाळी १० ते सायं ५) ते १७ सप्टेंबर (सकाळी १० ते दुपारी १)- मिळालेल्या महाविद्यालयात प्रवेश निश्चित करता येणार

* १७ सप्टेंबर- रिक्त जागांचा तपशील जाहीर होणार.

प्रवेश कसे होणार? : ६० टक्क्यांपेक्षा अधिक गुण असलेले विद्यार्थी आणि ३५ टक्क्यांपेक्षा अधिक गुण असलेले विद्यार्थी आणि एटीकेटी मिळालेले विद्यार्थी अशा तीन टप्प्यांत प्रवेशप्रक्रिया होणार आहे. रिक्त राहिलेल्या जागांवर सर्वात आधी जे विद्यार्थी ऑनलाइन प्रवेश निश्चित करतील त्यांना प्रवेश मिळू शकेल. आतापर्यंत प्रवेश निश्चित केलेल्या विद्यार्थ्यांना या फेरीत सहभागी व्हायचे असेल, तर त्यांनी घेतलेला प्रवेश रद्द करून या फेरीसाठी अर्ज भरायचा आहे. प्रवेश रद्द करण्यासाठी ३१ ऑगस्टपर्यंत मुदत आहे.