संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील व्याघ्र विहारामध्ये रविवारी नवीन वाघिणीचे आगमन होणार आहे. चंद्रपूर येथील वन्यजीव निवारा केंद्रातून या वाघिणीला येथे प्रजननासाठी आणण्यात येत आहे.

संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील व्याघ्र विहारामध्ये सध्या बिजली (वय ९), मस्तानी (९) आणि लक्ष्मी (१०) या तीन प्रौढ वाघिणी आहेत. व्याघ्र विहारात नर वाघ नसल्यामुळे गेल्याच वर्षी नागपूर येथून सुलतान हा पाच वर्षांचा वाघ प्रजननासाठी आणण्यात आला होता. मात्र वाघिणींचे वय अधिक असल्याने प्रजनन होऊ  न शकल्याचे, राष्ट्रीय उद्यानाचे संचालक आणि वनसंरक्षक जी. मल्लिकार्जुन यांनी सांगितले.

त्यामुळे नव्या वाघिणीची मागणी उद्यानातर्फे करण्यात आली होती. त्यानुसार चंद्रपूर येथील वन्यजीव निवारा केंद्राकडून नवीन वाघीण मुंबई येथे आणली जात आहे. चंद्रपूरहून शुक्रवारी या वाघिणीचा प्रवास सुरू झाला असून, रविवारी बोरिवली येथे राष्ट्रीय उद्यानात आगमनाची शक्यता आहे.

ही वाघीण चंद्रपूर वनपरिक्षेत्रात आठ महिन्यांपूर्वी एका गावातील गोठय़ानजीक बेवारस स्थितीत सापडली होती. त्या वेळी तिचे वय सुमारे तीन महिने होते. तिच्या आईशी तिची पुनर्भेट करविण्याचा प्रयत्न वनविभागाकडून झाला, मात्र त्यात यश मिळाले नाही. तेव्हापासून ही वाघीण वन्यजीव निवारा केंद्रातच आहे.

वय किती?

सध्या या वाघिणीचे वय ११ महिने आहे. प्रजननक्षम होण्यासाठी तिचे वय किमान अडीच वर्षे होणे अपेक्षित आहे. त्यानंतरच सुलतान वाघाबरोबर तिचे प्रजनन होऊ शकते. सध्या या वाघिणीस व्याघ्रवहारातील पिंजऱ्यातील सुविधांमध्ये ठेवण्यात येईल. मात्र व्याघ्र विहारात पर्यटकांना तिचे दर्शन मिळण्याची शक्यता इतक्यात नसल्याचे, मल्लिकार्जुन यांनी नमूद केले. मुख्य वनसंरक्षकांच्या परवानगीनंतरच त्यावर निर्णय होऊ शकेल असे त्यांनी सांगितले.