आर्थिक फसवणुकीचा आणखी एक प्रकार
तुम्हाला अमुक एक लॉटरी लागली आहे, परदेशातील अमुक एका माणसाने त्याची संपत्ती तुमच्या नावावर केली आहे किंवा तुमच्या डेबिट कार्डवर अमुक इतके पॉइंट जमा झाले आहेत अशा बाता करून व पैसे मिळण्याचे आमिष दाखवून नागरिकांना लुबाडणारे दूरध्वनी, एसएमएस, ई-मेल नेहमीच येत असतात. मात्र, १० लाख रुपयांचे कर्ज देण्याचे आमिष दाखवून थोडेथोडके नव्हे तर तब्बल ४३ लाख रुपये उकळल्याचा प्रकार मलबार हिल येथे उघडकीस आला आहे. गेले २३ महिने या ना त्या मार्गाने पैसे उकळण्याचा प्रकार सुरू असल्याची तक्रार एका व्यापाऱ्याने पोलिसांकडे केली असून या तक्रारीचा तपास करण्यात येत आहे.
मलबार हिल परिसरात राहणारे इलेक्ट्रॉनिक वस्तूंचे व्यापारी जितेन शहा (नाव बदलले आहे) यांना मे २०१४ मध्ये एका महिलेचा फोन आला. मी प्रुडेन्शिअल कनेक्ट कंपनीतून बोलत असून तुम्हाला १० लाख रुपयांचे कर्ज मंजूर झाल्याचे सांगण्यात आले. ५ टक्के व्याजदराने हे कर्ज मिळणार असून त्यासाठी फक्त काही सोपस्कार पार पाडावे लागतील, असे सांगण्यात आले. बसल्या जागी कर्ज मिळत असल्याचे ऐकून शहा खूश झाले. या पैशांचा वापर व्यवसायात होईल असा विचार करून त्यांनी कर्ज घेण्यास होकार कळविला. त्यानंतर त्यांना २५ हजार रुपये प्रोसेसिंग फी म्हणून भरण्यास सांगण्यात आले. त्यानंतर काही दिवसांनी एका पुरुषाने फोन करून कर्ज घेण्यास तुमची ‘ना हरकत’ आहे, हे पटण्यासाठी १ लाख रुपये मागण्यात आले. त्यानंतर कधी फाइल पुढे सरकविण्यासाठी, तर कधी डिमांड ड्राफ्ट शुल्क असे करत पैसे उकळणे सुरूच होते. २०१४ साली सुरू झालेला हा प्रकार तब्बल २३ महिने सुरू होता.
अखेर एप्रिल २०१६ मध्ये कंपनीकडून काहीच प्रतिसाद येत नसल्याचे पाहून शहा घाबरले. त्यांनी तातडीने मलबार हिल पोलिसांकडे धाव घेऊन याची तक्रार दिली. जवळपास दोन वर्षांत कर्ज देण्याच्या नावाखाली ४३ लाख रुपये चेकच्या माध्यमातून उकळल्याची तक्रार शहा यांनी मलबार हिल पोलिसांकडे दिली आहे. मलबार हिल पोलिसांनी शहा यांचा जबाब नोंदवून घेतला असून त्यांच्या तक्रारीची शहानिशा करत आहेत. शहा यांनी कोणत्या बँक खात्यांमध्ये पैसे जमा केले, ते कुठून काढण्यात आले, याचा तपास मलबार हिल पोलीस करत आहेत. अशा प्रकारे, फोनवरून कर्ज देण्याचे आमिष दाखवून बँक खात्याची माहिती मिळवून फसवणूक होऊ शकते, त्यामुळे नागरिकांनी अशा प्रकारच्या कॉलपासून सतर्क राहावे, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात येत आहे.