मुंबईसह देशभरातील संवेदनशील ठिकाणांची पाहणी

बांगलादेशने बंदी घातलेल्या अन्सारूल्ला बांगला टीम (एबीटी) ही दहशतवादी संघटना भविष्यात महाराष्ट्रासह भारतासाठी धोका ठरू शकते, असा अंदाज सुरक्षा यंत्रणांकडून वर्तविण्यात येत आहे. बोधगया घटनेनंतर चर्चेत आलेल्या एबीटी संघटनेच्या अतिरेक्यांनी मधल्या काळात मुंबईसह देशभरातील महत्त्वाच्या, संवेदनशील ठिकाणांची पाहणी केल्याचेही सुरक्षा यंत्रणांच्या तपासातून पुढे आले आहे. अल कायदाचा बांगलादेशातील चेहरा म्हणून उदयास आलेली एबीटी ही संघटना इंडियन मुजाहिद्दीनपेक्षा जास्त सुसज्ज, साचेबद्ध आणि अचूकरीत्या बॉम्ब (आयईडी) बनविण्यात पारंगत असल्याची माहितीही सुरक्षा यंत्रणांना मिळाली आहे.

महाराष्ट्राच्या दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) गेल्या आठवडय़ात पुणे, महाड आणि अंबरनाथ येथून पाच बांगलादेशींना अटक केली. अटक आरोपी एबीटीचे सदस्य आहेत. त्यांनी मधल्या काळात एबीटीच्या अतिरेक्यांना आश्रय दिल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यानुसार अटक आरोपींविरोधात गैरकृत्ये प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा नोंदवण्यात आल्याचे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने स्पष्ट केले. यातील मुख्य आरोपी राजू मंडल (३१) पुण्यातल्या संवेदनशील आस्थापनेशेजारी सुरू असलेल्या इमारत बांधकामात पर्यवेक्षक म्हणून काम करत होता, तर अन्य दोन आरोपी बांधकाम मजूर म्हणून काम करत होते. हे तिघे दोन वर्षांपासून पुण्यात वास्तव्यास असून त्यांच्याकडे आधार, पॅन कार्ड आणि भारतात वास्तव्यासाठी आवश्यक सर्व कागदपत्रे आहेत, तर उर्वरित दोघे अंबरनाथ आणि महाड येथे बांधकाम मजूर म्हणून काम करत होते. या पाच जणांनी भारतातील वास्तव्यात पुणे, ठाणे आणि रायगडमध्ये एबीटीचा तळ उभारला होता. या पाच जणांनी एबीटीच्या साथीदारांना आर्थिक मदत केल्याचा संशय आहे. जानेवारीत दलाई लामा यांच्या भेटीदरम्यान बोधगया येथे राष्ट्रीय सुरक्षा पथकाने दोन जिवंत बॉम्ब हस्तगत केले होते. या प्रकरणात एबीटीशी संबंधित सात बांगलादेशींना अटक करण्यात आली होती. एटीएसने अटक केलेल्या आणि २९ मार्चपर्यंत एटीएस कोठडीत असलेल्या पाच जणांचा बोधगया प्रकरणाशी संबंध आहे का? एबीटीचे भारतातील, म्होरके, साथीदार, त्यांचा उद्देश, भविष्यातील दहशतवादी कारवाया याबाबत कसून चौकशी सुरू आहे. या पाश्र्वभूमीवर महाराष्ट्रात एटीएसने अवैधरीत्या वास्तव्यास असलेल्या बांगलादेशींना रडारवर घेतले आहेत. एनआयए, केंद्रीय गुप्तचर यंत्रणा आणि राज्यांमधील दहशतवादविरोधी पोलीस पथकांनी एकत्रितरीत्या एटीबीविरोधात मोहीम सुरू केली आहे.

रोजगारासाठी महाराष्ट्रात आश्रय

सुमारे दहा वर्षांपूर्वी एबीटीचे अस्तित्व बांगलादेशमध्ये जाणवू लागले. अल कायदाशी संबंध स्पष्ट होताच बांगलादेश सरकारने दोन वर्षांपूर्वी संघटनेवर बंदी घातली. बंदीनंतर संघटनेच्या अतिरेक्यांनी ईशान्य भारतातील राज्ये, पश्चिम बंगालमध्ये घुसरखोरी करत आसरा घेतला. त्यातील काहींनी रोजगाराच्या निमित्ताने मुंबई, महाराष्ट्रात आश्रय घेतल्याचा अंदाज आहे.