विदर्भावर कायम अन्याय होत असल्याने महाराष्ट्रवाद्यांनो चालते व्हा, असे काही वर्षांपूर्वी नागपूरच्या हिवाळी अधिवेशात बोलणारे देवेंद्र फडणवीस हे आता महाराष्ट्र भाजपचे अध्यक्ष झाले आहेत. विशेष म्हणजे हे विधान करताच युतीतील भागीदार असलेले शिवसेनेचे आमदारच फडणवीस यांच्या दिशेने धावून गेले होते. त्याच शिवसेनेने फडणवीस यांना विरोधी पक्षाची व्याख्या काय, असा सवाल करीत नियुक्तीच्या पहिल्याच दिवशी मनसेवरून त्यांना टोला हाणला आहे.
देवेंद्र फडणवीस हे अभ्यासू आमदार तसेच फर्डे वक्ते म्हणून प्रसिद्ध आहेत. विदर्भावर होणाऱ्या अन्यायाच्या विरोधात ते नेहमीच आवाज उठवित असतात. विदर्भाच्या वाटय़ाचा निधी पश्चिम महाराष्ट्राकडे कसा वळविण्यात येतो हे त्यांनी अनेकदा आकडेवारीनिशी सभागृहात निदर्शनास आणून दिले आहे. निधीवाटपासंदर्भात राज्यपालांचे निर्देश बंधनकारक नाही, ही उच्च न्यायालयात मांडलेली भूमिका राज्य सरकारला बदलायला फडणवीस यांनी अलीकडेच भाग पाडले होते. २००३ मध्ये हिवाळी अधिवेशनात विदर्भावरील चर्चेत भाग घेताना सरकार विदर्भावर कसा अन्याय करते हे सांगत असताना फडणवीस यांचा पारा चढला आणि ‘महाराष्ट्रवाद्यांनो चालते व्हा’, असे उद्गार त्यांनी काढले होते. महाराष्ट्र विधिमंडळात एका आमदाराने ही भूमिका घेतल्याने त्याची साहजिकच प्रतिक्रिया उमटली. तत्कालीन विरोधी पक्षनेते नारायण राणे यांनी अशी भाषा सहन करणार नाही, असे फडणवीस यांना उद्देशून बजावले होते. शिवसेनेचे आमदार एवढे आक्रमक झाले की, काही जण फडणवीस यांच्या दिशेने सभागृहात धावून गेले होते. विदर्भावर होणाऱ्या अन्यायामुळे उद्वेग्न होऊन आपण तसे विधान केले होते, असे नंतर फडणवीस यांनी सांगितले होते.
प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती झाल्यावर फडणवीस यांनी मनसेसह सर्व विरोधकांची एकजूट करण्यावर भर दिला. यामुळे शिवसेनेत त्याची प्रतिक्रिया उमटली आहे. भाजप-शिवसेना-रिपाई ही युती मजबूत करण्यावर भर द्या, असा सल्ला शिवसेनेने देऊन फडणवीस यांचे स्वागत केले आहे.