मुंबई : सिंधुदुर्ग जिल्ह्य़ातील ओरोस येथे गेल्या आठवडय़ात तीन मुलांना भटक्या कुत्र्यांनी चावल्यानंतर जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी नेले तेव्हा श्वानदंशावरील लस उपलब्ध नसल्यामुळे बाहेरून खरेदी करून ती द्यावी लागली. राज्यातील अनेक जिल्हा रुग्णालये तसेच ग्रामीण रुग्णालयांमध्ये श्वानदंशावरील लस उपलब्ध नसल्यामुळे रुग्णांना स्वखर्चाने बाजारातून ही लस घ्यावी लागत आहे. राज्यात गेल्या वर्षभरात तब्बल दोन लाख ५८ हजार ८२८ लोकांना भटके कुत्रे चावल्याची नोंद आरोग्य खात्याकडे आहे. तर गेल्या वर्षभरात मुंबईत एक लाख १५२ लोकांना भटके कुत्रे चावण्याच्या प्रकार घडले.

राज्यासाठी एकत्रित औषध खरेदी करण्याची जबाबदारी हाफकिन महामंडळावर सोपविण्यात आल्यापासून या महामंडळाच्या कूर्मगती कारभारामुळे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांशी संलग्नित रुग्णालये तसेच आरोग्य विभागाच्या विविध रुग्णालयांमध्ये औषधांची ओरड आहे. तथापि श्वानदंशावरील लसींच्या निविदा वेळेत काढण्यात आल्यानंतरही केवळ पुरवठा करणाऱ्या कंपन्यांची क्षमता कमी असल्यामुळे वेळेवर पुरवठा करणे शक्य होत नसल्याचे आरोग्य विभागातील ज्येष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले. आरोग्य विभागाअंतर्गत येणाऱ्या रुग्णालयांमध्ये श्वानदंशाच्या वार्षिक दोन लाखाहून अधिक घटना घडत असल्यामुळे आरोग्य विभागाकडून श्वानदंशावरील लसीच्या सुमारे नऊ लाख ३० हजार कुप्या खरेदी केल्या जातात. यासाठी सुमारे १४ कोटी रुपये खर्च केले जात असून या लसींचा पुरवठा वेळेवर होऊ न शकल्यामुळे जिल्हा रुग्णालये तसेच ग्रामीण रुग्णालयांमध्ये लसींची कमतरता असल्याचे आरोग्य विभागातील डॉक्टरांचे म्हणणे आहे.

भारतात एकूण चार कंपन्या श्वानदंशावरील लसींचे उत्पादन करत असून यापैकी एका कंपनीने आपले उत्पादनाचे केवळ खाजगी वितरण करण्याचा निर्णय घेतल्यामुळे त्याचा ताण अन्य तीन कंपन्यांवर येऊन पडला. याचा मोठा फटका पुरवठय़ामध्ये होऊन वेळेत पुरवठा करणे कंपन्यांना शक्य होत नसल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. आरोग्य विभागाने मार्चमध्ये नऊ लाख ३० लसींची निविदा मंजूर केली. मार्च, जून व ऑक्टोबर अशा तीन टप्प्यात हा पुरवठा होणे अपेक्षित होते. यापैकी मार्च महिन्यातील तीन लाख २० हजार लसींचा पुरवठा होण्यास गेला महिना उजाडला असून आगामी तीन लाख २० हजार लसींचा पुरवठा येत्या १५ दिवसात होईल, असे आरोग्य विभागाच्या एका ज्येष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. मात्र श्वानदंशावरील लस उपलब्ध नसल्यास जिल्हा रुग्णालयातील संबंधित अधिकाऱ्यांनी रुग्णालयाच्या निधीतून लस विकत घेऊन रुग्णांना देणे अपेक्षित असताना प्रत्यक्षात हा खर्च रुग्णांच्या माथी मारला जात असल्यामुळे काही लोकप्रतिनिधींनी याबाबत तक्रार दाखल केली आहे.

श्वानदंशावरील लसींची काही ठिकाणी कमतरता असली तरी जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी आलेल्या रुग्णाला बाहेरून लस खरेदी करावी लागत असेल तर त्याची चौकशी केली जाईल. जिल्हा रुग्णालयांनी आपल्या निधीतून ही लस रुग्णाला उपलब्ध करून द्यावी अशा सक्त सूचना दिल्या जातील.

-डॉ. संजीव कांबळे, आरोग्य संचालक

भारतात एकूण चार कंपन्या श्वानदंशावरील लसींचे उत्पादन करत असून यापैकी एका कंपनीने आपले उत्पादनाचे केवळ खाजगी वितरण करण्याचा निर्णय घेतल्यामुळे त्याचा ताण अन्य तीन कंपन्यांवर येऊन पडला.