बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर दुस-या दिवशी पाळण्यात आलेल्या ‘मुंबई बंद’ बाबतच्या फेसबुकवरील प्रतिक्रियेवरून उठलेल्या वादंगातून झालेल्या तोडफोड प्रकरणी आज (मंगळवार) सकाळी पोलिसांनी नऊ जणांना अटक केली आहे. दरम्यान, पोलिसांनी काल (सोमवार) ठाण्यातून अटक करण्यात आलेल्या दोन तरूणींची न्यायालयाने जामिनावर सुटका केली आहे. शाहीन धाडा या तरूणीने फेसबुकवर नोंदवलेल्या प्रतिक्रियेचा निषेध करण्‍यासाठी शिवसैनिकांच्या जमावाने धाडा हिच्या नातेवाईकांच्या पालघर येथील रूग्णालयातील मालमत्तेची नासधूस केली होती.  
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे शनिवारी संध्याकाळी निधन झाल्यानंतर ताबडतोब मुंबईत बंदसदृश परिस्थिती निर्माण झाली होती. दुस-या दिवशी म्हणजेच रविवारीही त्यांची अंत्ययात्रा निघणार असल्याने मुंबईतील काही सार्वजनिक सुविधा वगळता सर्व व्यवहार बंद ठेवण्यात आले होते.
याबाबत शाहीन धाडा (२१) या तरूणीने, ‘आपण भगतसिंग, सुखदेव यांच्या स्मृती जागविल्या पाहिजेत, ठाकरे यांच्या निधनानंतर बंद करायला नको,’ असे फेसबुकवर म्हटले होते. त्यावर तिची मैत्रीण रितू श्रीनिवासन (२०) हिने मजकुराला ‘लाइक’ (पसंती दर्शवली होती) केले होते. त्यावरून पोलिसांनी शाहीन आणि रितू या दोघींना ठाण्यातून अटक करून नंतर या जामिनावर सोडण्यात आले.    
मात्र, शाहीनने टाकलेली प्रतिक्रिया हिंसाचाराला उत्तेजन देणारी नव्‍हती, असा दावा तिच्‍या वकीलांनी केला आहे. शाहीन आणि रितूच्या अटकेनंतर समाजातील विविध स्तरांमधून वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत.