करोना संसर्गाचे निदान मोठय़ा प्रमाणात करण्यासाठी मुंबई पालिकेने पहिल्या टप्प्यात करोना फैलाव रोखण्यासाठी जोखमीची कामे करणाऱ्या एक हजार कर्मचाऱ्यांची खासगी प्रयोगशाळांमार्फत अ‍ॅण्टिबॉडी चाचणी करण्याचा निर्णय घेतला आहे.

कोणत्याही विषाणूचा संसर्ग झाल्यानंतर शरीरातील प्रतिकारकशक्ती अधिक कार्यरत होते. या विषाणूंचा सामना करण्यासाठी अ‍ॅण्टिबॉडीज तयार झालेल्या असतात. त्यामुळे ज्या रुग्णांची अ‍ॅण्टिबॉडी चाचणी सकारात्मक असेल त्यांना करोनाचा संसर्ग झाला असल्याचे स्पष्ट होते. यावरून त्या व्यक्तींना विलगीकरणात ठेवून संसर्ग प्रसार रोखणे शक्य आहे.

करोनाची चाचणी खर्चीक, वेळखाऊ आणि उपलब्धता कमी असल्याने चाचण्या करण्याची क्षमताही मर्यादित आहे. रुग्णांची वाढती संख्या आणि समूह प्रसाराचे काही पुरावे समोर येत असल्याने याघडीला चाचण्यांची क्षमता वाढविणे आवश्यक आहे.  अ‍ॅण्टिबॉडी चाचणी करण्याचा पर्याय वेळ आणि खर्चाच्या तुलनेने सहज शक्य आहे, या दृष्टीने मुंबई पालिकेने ही चाचणी करण्याचा निर्णय घेतला आहे.

पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचारी, सफाई कामगार असे करोनाबाधितांच्या संपर्कात येणाऱ्या १ हजार व्यक्तींची चाचणी केली जाईल. चाचणी ऐच्छिक असून कोणालाही बंधनकारक नसेल. यासाठी आवश्यक यंत्रसामुग्री मागविणे किंवा बाहेरील प्रयोगशाळामार्फत करवून घेण्याचे दोन पर्याय सध्या पालिकेसमोर आहेत, असे अतिरिक्त आयमुक्त सुरेश काकाणी यांनी सांगितले.

खासगी चाचणी शुल्क ३५० रुपये

यंत्रसामुग्री, आवश्यक किट खरेदी करून चाचण्या करण्यास वेळ लागू शकतो. या कारणास्तव सुरुवातीला दोन ते तीन खासगी प्रयोगशाळांचा विचार केला जात आहे. यासाठी सर्वसाधारणपणे ३५० रुपये शुल्क आकारले जाईल, अशी मर्यादा ठेवली आहे. परंतु गरजेनुसार यातही बदल केला जाईल. लवकरच या चाचण्या सुरू होऊन त्यांच्या अहवालांचे निष्कर्ष विचारात घेऊन पुढे या चाचण्या कराव्यात का, यावर निर्णय घेतला जाईल, असेही काकाणी यांनी स्पष्ट केले.

‘त्या’ ८९२० जणांना शोधण्यात यश

मुंबईमध्ये शुक्रवापर्यंत सुमारे २७८ जणांना करोनाची बाधा झाल्याचे चाचणीच्या अहवालावरून स्पष्ट झाले आणि या सर्व बाधितांच्या संपर्कात आलेल्या तब्बल ८९२० जणांचा शोध घेण्यात पालिकेला यश आले आहे. या सर्वाना विलगीकरणात ठेवण्यात आले आहे. मुंबईमधील करोनाबाधितांची संख्या शुक्रवारी २७८ वर पोहोचली होती. या बाधितांच्या संपर्कात आलेली अनेक मंडळी मुंबईच्या विविध भागांत वास्तव्यास होती. त्यापैकी काही चाळीत, तर काही झोपडपट्टय़ांमध्ये राहात आहेत. यापैकी झोपडपट्टी आणि चाळींमध्ये राहणाऱ्या ९०० जणांना विलगीकरणात ठेवण्याची व्यवस्था पालिकेने केली आहे. काही जणांना वसतिगृहात, तर काही जणांना हॉटेलमध्ये ठेवण्यात आले आहे. तर बाधितांच्या संपर्कात आलेल्या उर्वरित नागरिकांनी आपल्या घरात विलगीकरणात राहणे पसंत केले आहे. घरातच वेगळे राहणाऱ्या या नागरिकांवर पालिकेच्या आरोग्य खात्यातील डॉक्टर आणि अन्य कर्मचारी लक्ष ठेवून आहेत.