पालिका रुग्णालयांत संसर्ग प्रसार रोखण्यासाठी निर्णय

शैलजा तिवले, लोकसत्ता

मुंबई : मुंबईतील पालिका रुग्णालयांमध्ये करोनाव्यतिरिक्त इतर आजारांवर उपचार, शस्त्रक्रिया करण्यापूर्वी संसर्ग प्रसार रोखणे आणि सुरक्षेच्या दृष्टीने संबंधित रुग्णाची प्रतिपिंड चाचणी करण्यात येणार आहे.

मार्चपासून पालिका रुग्णालयामध्ये करोना उपचारांशिवाय केवळ अत्यावश्यक रुग्णसेवा दिल्या जात होत्या. परंतु आता शहरातील करोना संसर्गाचा प्रादुर्भाव हळूहळू कमी होत असल्याने बिगर करोना उपचार, अतिरिक्त शस्त्रक्रिया अशा सर्व सेवा पूर्ववत सुरू करण्यात येणार आहेत. रुग्णापासून संसर्ग प्रसाराचा धोका असल्याने रुग्ण दाखल झाल्यानंतर त्यांच्या प्रतिपिंड चाचण्या केल्या जातील. जेणेकरून संसर्ग होऊन गेला आहे किंवा सध्या संसर्ग आहे का याचे निदान होईल.

आरटीपीसीआर चाचणीचे अहवाल येण्यासाठी २४ तासांहून अधिक कालावधी लागतो. प्रतिजन चाचणी १०० टक्के अचूक नाही. अशा परिस्थितीत रुग्ण हा संशयित आहे का याची तपासणी करण्यासाठी प्रतिपिंड चाचणीचा पर्यायही रुग्णालयांसाठी उपलब्ध केला जाईल. जेणेकरून रुग्णामध्ये प्रतिपिंडे असल्याचे आढळल्यास निर्धोकपणे उपचार करता येतील, असे पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी सांगितले.

रुग्णालयात रुग्ण दाखल असलेल्या रुग्णांच्याच या चाचण्या केल्या जातील. रुग्णालयात या चाचणीच्या वापराबाबतची मार्गदर्शक तत्त्वे लवकरच जाहीर करण्यात येतील. आवश्यकतेनुसार ही चाचणी करावी याचा निर्णय घेण्याचे अधिकार डॉक्टरांना असतील, असे पालिका अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

सध्या रुग्णालयात शस्त्रक्रिया करण्यापूर्वी रुग्णांच्या आरटीपीसीआर चाचण्या केल्या जातात. परंतु आपत्कालीन स्थितीमध्ये आरटीपीसीआरचे अहवाल येईपर्यत प्रतीक्षा करणे शक्य नसते. प्रतिजन चाचणीमध्ये अचूक निदान होतेच असे नाही. त्यामुळे प्रतिपिंड चाचणी उपलब्ध झाल्यास रुग्णाला संसर्ग होऊन गेला आहे का हे निदान करणे सोपे होईल. त्यानुसार वॉर्ड किंवा शस्त्रक्रियागृहामध्येही रुग्णाला हाताळताना काळजी घेता येईल, असे पालिका रुग्णालयातील डॉक्टरांनी सांगितले.

व्यावसायिकांना पालिकेकडून मार्गदर्शन

दुकाने, व्यवसाय किंवा कार्यालये खुली करण्यापूर्वी कर्मचाऱ्यांच्या प्रतिपिंड चाचण्या करण्यासाठीही पालिकेकडून मार्गदर्शन केले जाणार आहे. यासाठी दर्जेदार चाचणी असलेल्या काही खासगी प्रयोगशाळा आणि दर निश्चित करून चाचण्या खुल्या केल्या जातील. जेणेकरून मुंबईकरांमधील टाळेबंदीनंतर पूर्ववत सर्व व्यवहार सुरू करण्याची भीती दूर होईल आणि आत्मविश्वास येईल. पालिकेमार्फत मात्र या चाचण्या केल्या जाणार नाहीत, असे काकाणी यांनी स्पष्ट केले.