मुंबई : उद्योगपती मुकेश अंबानी धमकी आणि व्यावसायिक मनसुख हिरेन आत्महत्या प्रकरणात अटकेत असलेला आरोपी मनीष सोनी याने महानगरदंडाधिकाऱ्यांसमोर कबुलीजबाब नोंदवल्याची माहिती राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) सोमवारी विशेष न्यायालयात दिली.

एनआयएने माजी पोलीस अधिकारी प्रदीप शर्मा यांच्यासोबत सतीश मोथकुरी, सोनी यांना अटक केली होती. सतीश आणि सोनी हिरेन यांच्या हत्येत प्रत्यक्ष सहभागी होते. हत्येनंतर अन्य आरोपींच्या मदतीने त्यांनी हिरेन यांच्या मृतदेहाची विल्हेवाट लावली, असा दावा एनआयएने याआधी न्यायालयात के ला होता. सोनी याचा कबुलीजबाब आरोपींविरोधातील भक्कम पुरावा ठरू शकतो.

सोनी आणि मोथकोरी यांच्या कोठडीची मुदत संपल्याने सोमवारी त्यांना विशेष न्यायालयात हजर करणे अपेक्षित होते. मात्र सोनी याने फौजदारी दंड संहितेतील कलम १६४नुसार कबुली जबाब देण्याची इच्छा व्यक्त के ली. त्यानुसार त्याचा कबुलीजबाब नोंदवण्यासाठी महानगर दंडाधिकाऱ्यांसमोर हजर केले गेले. दंडाधिकाऱ्यांनी त्याला न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.