12 November 2019

News Flash

दुधात प्रतिजैविकांचे अंश, विषारी घटक

अन्न सुरक्षा आणि मानके प्राधिकरणाचा अहवाल

(संग्रहित छायाचित्र)

राज्यातील दुधाच्या नमुन्यांमध्ये प्रतिजैविकांच्या अंशांसह विषारी घटक (अ‍ॅफ्लॉटॉक्सीन एम १) आढळल्याचे केंद्रीय अन्न सुरक्षा आणि मानके प्राधिकरणाने जाहीर केलेल्या ‘राष्ट्रीय दूध सुरक्षा आणि दर्जा सव्‍‌र्हेक्षण’च्या अहवालातून निदर्शनास आले आहे. देशभरात दुधाचे ७ टक्के नमुने असुरक्षित आढळले आहेत, तर ४१ टक्के दुधाचे नमुने दर्जेदार असल्याचे या अहवालात स्पष्ट केले आहे.

प्राधिकरणाने मे ते ऑक्टोबर २०१८ या काळात देशभरातील जवळपास एक हजाराहून अधिक शहरांमधून प्रक्रिया आणि प्रक्रिया न केलेले दुधाचे ६४३२ नमुने गोळा करून तपासण्या केल्या. महाराष्ट्रातून ६७८ नमुने घेतेले होते. या अहवालानुसार, देशभरात १.२ टक्के नमुन्यांमध्ये प्रतिजैविकांचे अंश आढळले. सर्वाधिक प्रतिजैविकांचे अंश मध्य प्रदेशातील नमुन्यांमध्ये (२३ नमुने)आढळले. त्याखालोखाल महाराष्ट्रात ९ नमुन्यांमध्ये असे अंश आढळले. देशात ५.७ टक्के नमुन्यांमध्ये ‘अ‍ॅफ्लॉटॉक्सीन एम १’ हा विषारी घटक आढळला आहे. तमिळनाडू, दिल्ली, केरळमील नमुन्यांमध्ये ‘अ‍ॅफ्लॉटॉक्सीन एम १’ या घटकाचे सर्वाधिक प्रमाण आढळले. महाराष्ट्रातील २० नमुन्यांमध्ये हा घटक आढळला. प्राधिकरणाने दुधाच्या नमुन्यांमध्ये या घटकाची चाचणी प्रथमच केली.

हायड्रोजन पॅरॉक्साईड, युरिआ, डिर्टजट

तेलंगणा, मध्य प्रदेश आणि केरळमध्ये १२ नमुने भेसळयुक्त आढळले. तेथील नमुन्यांमध्ये प्रामुख्याने हायड्रोजन पॅरॉक्साईड, युरिआ आणि डिर्टजटचे अंश सापडले. धक्कादायक म्हणजे दुधात मॅल्टोडेक्सिट्रिन (१५६ नमुने) आणि साखरेचे(७८) अंश सापडले. प्रामुख्याने प्रक्रिया केलेल्या दुधात हे अंश आढळले. ते आरोग्यासाठी अहितकारक नसले तरी दुधामधील स्निग्धांश (फॅट) आणि स्निग्धांश विरहित घनपदार्थ (एसएनएफ) वाढविण्यासाठी याचा वापर केला जात असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे असे प्रकार रोखणे आवश्यक असल्याचे अहवालात म्हटले आहे.

केवळ ४१ टक्के दूधच दर्जेदार

देशभरात ९३ टक्के नमुने सुरक्षित असल्याचे नमूद करत प्राधिकरणाने देशातील दूध आरोग्यासाठी सुरक्षित असल्याचे म्हटले आहे. परंतु केवळ ४१ टक्के दूधच दर्जेदार असल्याचे आढळले आहे. प्राण्यांना उत्तम प्रतीचे खाद्य न दिल्याने किंवा दुधात पाण्याची भेसळ केल्याने कच्चे आणि प्रक्रिया केलेल्या दुधाचा दर्जा कमी झाल्याची शक्यता प्राधिकरणाने व्यक्त केली आहे.

राज्यात दुग्धोत्पादन हा व्यवसाय प्रामुख्याने सांगली, सातारा, कोल्हापूर, अहमदनगर या भागामध्ये केला जातो. या भागात संकरित जनावरांचे प्रमाण सर्वाधिक आहे. या जनावरांची रोगप्रतिकारक शक्ती मुळातच कमी असते. शेतामध्ये कीटकनाशकांचा अतिवापर केला जात असल्याने हा चारा खाऊन जनावरांची प्रतिकारकशक्ती आणखी कमी होते. जगविण्यासाठी यांच्यावर प्रतिजैविकांचा मारा करावा लागतो. परिणामी या प्रतिजैविकांचे अंश दुधामध्ये येतात. हे रोखण्यासाठी संकरित जनावरांना पर्याय म्हणून देशी जनावरांचे दूध वाढण्यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे. तसेच कीटकनाशकमुक्त चारा जनावरांना देणे आवश्यक आहे.

– सजल कुलकर्णी, देशी पशूंचे अभ्यासक

 

First Published on October 21, 2019 1:06 am

Web Title: antioxidants toxic constituents in milk abn 97