17 November 2017

News Flash

‘बर्फी’ बाद..

मूक आणि कर्णबधीर तरूण व ऑटिस्टिक तरूणीच्या प्रेमाची कथा सांगणारा अनुराग बसू दिग्दर्शित ‘बर्फी’

प्रतिनिधी , मुंबई | Updated: December 23, 2012 2:24 AM

मूक आणि कर्णबधीर तरूण व ऑटिस्टिक तरूणीच्या प्रेमाची कथा सांगणारा अनुराग बसू दिग्दर्शित ‘बर्फी’ ऑस्करच्या स्पर्धेतून बाद झाला आहे. सर्वोत्तम विदेशी चित्रपट विभागासाठी पाठविलेला हा चित्रपट अंतिम निवडफेरीत पोहोचण्याआधीच अपात्र ठरला, असे अकॅडमी अॅवॉर्ड्सने सांगितले आहे.
या चित्रपटाच्या ऑस्करवारीवरून वादाचे मोहोळ उठले होते. त्यातील अनेक प्रसंग इंग्रजी चित्रपटांवरून जसेच्या तसे घेतले असताना हा चित्रपट ऑस्करसाठी पाठवून आपण आपलीच मानहानी करून घेतो आहोत, अशा प्रकारची टीका चित्रपटसृष्टीतून होऊ लागली होती. तरीही हा चित्रपट ऑस्करच्या स्पर्धेसाठी पाठविण्यात आला होता. या चित्रपटाचे आपल्याकडे समीक्षकांनी कौतुक केले होते. शिवाय, या चित्रपटाला तिकीटबारीवरही चांगले यश मिळाले होते. मात्र, आशयात्मक आणि तंत्रात्मकदृष्टय़ा वेगळ्या असणाऱ्या या चित्रपटाला ऑस्करच्या स्पर्धेसाठीची किमान पात्रता मिळविण्यातही सपशेल अपयश आले आहे.
ऑस्करच्या विदेशी चित्रपट विभागासाठी जगभरातून ७१ चित्रपटांच्या प्रवेशिका दाखल झाल्या होत्या. त्यापैकी केवळ नऊच चित्रपटांना निवडफेरीत प्रवेश मिळविण्यात यश आले आहे. या नऊ चित्रपटांपैकी केवळ पाच चित्रपट निवड समितीकडून अंतिम फेरीसाठी पाठवले जाणार आहेत.
‘बर्फी’ चित्रपट बाद झाल्यामुळे ऑस्कर पुरस्कार मिळविण्याच्या आपल्या आशेवर पुन्हा एकदा पाणी फिरले आहे. याआधी १९५८ सालचा मेहबूब खानचा ‘मदर इंडिया’, १९९८ चा मीरा नायरचा ‘सलाम बॉम्बे’ आणि २००२ साली आशुतोष गोवारीकरच्या ‘लगान’ला ऑस्करचे नामांकन मिळाले होते. पण, यापैकी कोणत्याच चित्रपटाला ऑस्कर मिळाला नाही.
‘द अकॅडमी अॅवॉर्ड्स’च्या अंतिम नामांकनाची घोषणा अॅकॅडमीच्या गोल्डन सॅम्युएल थिएटरमध्ये १० जानेवारी २०१३ मध्ये करण्यात येणार असून ऑस्करचा सोहळा २४ फेब्रुवारी २०१३ मध्ये हॉलिवूडच्या डॉल्बी थिएटरमध्ये होणार आहे.    

ऑस्ट्रियाचा ‘अॅमूर’, कॅनडाचा ‘वॉर विच’, चिलीचा ‘नो’, डेन्मार्कचा ‘अ रॉयल अफेअर’, फ्रान्सचा ‘द इनटचेबल्स’ आणि आर्यलडचा ‘द डीप’, नॉर्वेचा ‘कॉन-तिकी’, स्विर्झलडचा ‘सिस्टर’ आणि ‘द बियॉंड हिल्स’ या रोमानियन चित्रपटांचा अंतिम फेरीत जाणाऱ्या नऊ चित्रपटांत समावेश आहे.

First Published on December 23, 2012 2:24 am

Web Title: anurag basus barfi out of oscar race
टॅग Barfi,Bollywood,Oscar