वास्तुसजावटकार अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणी तपास करणारे अलिबाग पोलीस ठाण्याचे तत्कालिन पोलीस निरीक्षक सुरेश वराडे यांना निलंबीत करावे, अशी विनंती कोकण परिक्षेत्रच्या उप महानिरीक्षकांनी मीरा-भाईंदर-वसई-विरार पोलीस आयुक्तालयाकडे केली आहे. प्राथमिक चौकशीदरमयान वराडे यांनी नाईक आत्महत्या प्रकरणात त्रुटी ठेवल्याचे प्रथमदर्शनी स्पष्ट होत असल्याचे या पत्रात नमूद करण्यात आले आहे.

मीरा-भाईंदर-वसई-विरार पोलीस आयुक्तालयातील वरिष्ठ अधिकाऱ्याने या वृत्तास दुजोरा दिला. पत्र सोमवारी  प्राप्त झाले. या विनंतीपत्रासह जोडण्यात आलेल्या अहवालानुसार अन्वय, त्यांची आई कुमूद यांची आत्महत्या उघडकीस आली त्यादिवशी सकाळी आठच्या सुमारास वराडे घटनास्थळी दाखल झाले. मात्र अन्वय आणि

कुमूद यांना दुपारी तीनच्या सुमारास रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यावरून वराडे यांनी  दोघांना वैद्यकीय मदत पुरवली नाही. आत्महत्येपूर्र्वी लिहिलेली अन्वय यांची चिठ्ठी सापडूनही वराडे यांनी गुन्हा नोंद करण्याऐवजी अपघाती मृत्यू या नोंदीवरच चौकशी सुरू ठेवली. तसेच तीन महिन्यांनी अन्वय यांच्याविरोधात आई कुमूद यांच्या हत्येचा गुन्हा नोंदवणे, प्रकरणातील प्रमुख साक्षीदारांचे थातुरमातुर जबाब नोंदवणे, असाही ठपका वराडे यांच्यावर ठेवण्यात आला.

वराडे यांच्याविरोधातील प्राथमिक चौकशी पूर्ण होण्यास आणखी काही दिवस अपेक्षित आहेत. मात्र ते आपल्या पदाचा, अधिकाराचा गैरवापर करून हस्तक्षेप करू शकतील. त्यामुळे त्यांना चौकशी पूर्ण होईपर्यंत निलंबीत करावे, अशी विनंती उपमहानिरीक्षक कार्यालयाने केली आहे.

सत्याचा विजय होईल-अक्षता नाईक

अलिबाग: सत्य आपोआप बाहेर पडते. सत्याचा विजय होईल, असा विश्वास अक्षता नाईक यांनी व्यक्त केला.वास्तुरचनाकार अन्वय नाईक यांच्या आत्महत्येप्रकरणी अटकेत असलेले अर्णब गोस्वामी यांना पोलीस कोठडी मिळण्याबत अलिबाग पोलिसांनी सत्र न्यायालयात पुनर्निरीक्षण अर्ज दाखल केला आहे. त्याची सुनावणी सोमवारी (दि. ९) होती. त्या वेळी अन्वय नाईक यांच्या पत्नी अक्षता नाईक व मुलगी आज्ञा नाईक आज न्यायालयात आल्या होत्या. दरम्यान त्यांना पोलीस संरक्षण देण्यात आले आहे.

अर्णब यांची सुरक्षा, प्रकृतीबद्दल राज्यपालांना चिंता

मुंबई : अर्णब गोस्वामी यांच्या प्रकृतीबद्दल आणि सुरक्षेविषयी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी चिंता व्यक्त केली आहे. गोस्वामी यांच्या भेटीची परवानगी त्यांच्या कु टुंबीयांना द्यावी, अशी सूचनाही राज्यपालांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांना दूरध्वनी करून दिली.  राज्यपालांवर राष्ट्रवादी काँग्रेसने जोरदार टीका केली आहे. गंभीर गुन्ह्य़ातील आरोपीला सहानुभूती दाखवण्याऐवजी राज्यपालांनी नाईक कुटुंबाला सहानुभूती दाखवली असती तर बरे झाले असते, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे प्रवक्ते आणि अल्पसंख्याक विकासमंत्री नवाब मलिक यांनी व्यक्त केली.

कारागृहात पोलीस चौकशीला परवानगी

न्यायालयीन कोठडीत असलेल्या तीनही आरोपींच्या चौकशीला अलिबागच्या मुख्य न्यायदंडाधिकारी यांनी परवानगी दिली आहे. तीन तास पोलिसांना कारागृहात जाऊन त्यांची चौकशी करता येणार आहे.