भाजप-शिवसेनाचे उमेदवार अडचणीत येण्याची शक्यता

पालिका कर्मचाऱ्यांसाठीच्या इमारतीत नियमबाह्य़पणे सदनिका खरेदी करून तेथे वास्तव्य करत असलेले शिवसेना आणि भाजपचे एकाच प्रभागातील प्रतिस्पर्धी उमेदवार अडचणीत येण्याची शक्यता आहे. पालिका कर्मचाऱ्यांसाठीची घरे अन्य व्यक्तीला विकण्यास मनाई असताना या दोघांनीही ही घरे खरेदी केली. त्यातच गृहकर्ज आणि भुईभाडय़ापोटी तब्बल दीड कोटी रुपयांच्या आसपास या गृहनिर्माण सोसायटीची थकबाकी आहे. त्यामुळे ऐन निवडणुकीच्या हंगामात या दोन्ही उमेदवारांविरोधात गृहनिर्माण सोसायटीने उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.

पालिकेतील तृतीय आणि चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांच्या घरांसाठी प्रशासनाने साई प्रसाद सहकारी गृहनिर्माण संस्थेला १९९४ मध्ये सांताक्रूझ (पूर्व) येथील गोळीबार रोड परिसरातील २,६२५ चौरस मीटर क्षेत्रफळाचा भूखंड दिला होता. भूखंडाच्या भुईभाडय़ापोटी संस्थेकडून प्रतिवर्षी ४,५३,००० रुपये पालिकेला देण्याचा करार करण्यात आला. या भूखंडावर उभारलेल्या इमारतीमध्ये ७० सदनिका बांधण्यात आल्या आणि त्या तृतीय आणि चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांना देण्यात आल्या. मात्र या सदनिका पालिका कर्मचाऱ्याशिवाय अन्य व्यक्तीला विकता येणार नाही अशी अट प्रशासनाने घातली होती. या इमारतीमधील सभासदांना ६.२५ टक्के व्याजदराने गृहकर्ज देण्यात आले होते. मात्र सदनिकेत पालिका कर्मचाऱ्याव्यतिरिक्त अन्य व्यक्ती वास्तव्यास असल्यास गृहकर्जावर १८.७५ टक्के दराने व्याज आकारण्याचाही निर्णय प्रशासनाने घेतला होता. या इमारतीतील नऊ सदनिकाधारक कर्मचाऱ्यांनी नियम धाब्यावर बसवून आपल्या सदनिका पालिकेच्या सेवेत नसलेल्यांना विकल्या. ही बाब लक्षात आल्यानंतर पालिका प्रशासनाने याप्रकरणी कारवाईचे आदेश दिले होते. मात्र आजपर्यंत त्यावर काहीही कारवाई झालेली नाही.

या सदनिका खरेदी करणाऱ्यांमध्ये भाजपचे विद्यमान नगरसेवक कृष्णा धोंडू पारकर आणि शिवसेनेचे माजी नगरसेवक विश्वनाथ पांडुरंग महाडेश्वर यांचा समावेश आहे. प्रभाग क्रमांक ८७ मधून कृष्णा पारकर भाजपच्या उमेदवारीवर, तर विश्वनाथ महाडेश्वर शिवसेनेच्या उमेदवारीवर निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत.

पालिकेचे कर्मचारी नसतानाही या दोघांनी या इमारतीमधील सदनिका विकत घेतली असून त्यासाठी पालिका आयुक्तांची पूर्वपरवानगीही घेतलेली नाही. तसेच सोसायटीची पालिकेकडे मोठी थकबाकी आहे. याबाबत या परिसरातील नागरिक महेंद्र कृष्णा पवार यांनी पालिका आणि निवडणूक आयोगाकडे या दोघांविरोधात तक्रार केली होती. मात्र आपण सोसायटीकडे आपली थकबाकीची रक्कम दिली असून तक्रारीमध्ये दर्शविण्यात आलेली थकबाकीची रक्कम सोसायटीची आहे. त्याच्याशी आपला काहीच संबंध नाही, असा खुलासा या दोघांनी केला आहे. या खुलाशानंतर निवडणूक अधिकाऱ्यांनी त्यांच्या उमेदवारीला हिरवा कंदील दाखविला. मात्र केवळ पालिका कर्मचाऱ्यांनाच सदनिका विकण्याची अट असतानाही या दोघांनी नियमाला हरताळ फासून या इमारतीमधील खरेदी केलेल्या सदनिकेचा प्रश्न अनुत्तरीतच राहिला आहे. नियमभंग करून सदनिका खरेदी केल्याप्रकरणी अधिकाऱ्यांकडून कोणतीही कारवाई करण्यात न आल्यामुळे महेंद्र कृष्णा पवार यांनी थेट न्यायालयाचे दरवाजे ठोठावले आहेत. त्यामुळे पारकर आणि महाडेश्वर यांची उमेदवारी अडचणीत येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. दरम्यान, या  संदर्भात साई प्रसाद सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता संपर्क होऊ शकला नाही.

या इमारतीमधील सदनिकेची नोंदणी केली असून मुद्रांक शुल्कही भरले आहे. केवळ पालिका कर्मचाऱ्यालाच सदनिका विकण्याचा नियम पालिका प्रशासनाने दोनच महिन्यांपूर्वी शिथिल केला आहे. माझी कुठल्याही प्रकारची थकबाकी नाही.

कृष्णा पारकर, भाजप उमेदवार

या इमारतीमधील सदनिकेत आपण राहात असलो तरी ती मूळ सदनिकाधारकाच्याच नावावर आहे. आपण सोसायटीचे सभासदही नाही.

विश्वनाथ महाडेश्वर, शिवसेना उमेदवार