सोमवारपासून म्हणजेच १८ तारखेपासून नवीमुंबईतील एपीएमसी मार्केट सुरु होणार आहे. १८ मेपासून भाजीपाला, धान्य आणि मसाला बाजार आवार सुरु होणार आहे. तर गुरुवार २१ मेपासून कांदा-बटाटा आणि फळ बाजार आवार सुरु होणार आहे. मुंबई कृषि उत्पन्न बाजार समितीची बाजार आवारं सुरु करण्याबाबत आज पणन विभागाचे प्रधान सचिव अनुपकुमार, तसंच विभागीय आयुक्त शिवाजीराव दौंड यांच्या अध्यक्षतेखाली एक बैठक पार पडली त्यात हा निर्णय घेण्यात आला आहे.

सगळ्या उपस्थितांनी करोना विषाणूचा संसर्ग वाढू नये म्हणून उपाय योजना करण्याबाबत चर्चा केली. तसेच बाजार आवारात प्रवेश करणाऱ्या व्यक्तीचे थर्मल चेकिंग, रक्तातील ऑक्सिजनचे प्रमाण पल्स मीटरद्वारे करण्यात यावे. त्याशिवाय कोणालाही या आवारात प्रवेश देऊ नये असाही ठराव मंजूर कऱण्यात आला. बाजार आवारात प्रवेश करणाऱ्या वाहनांची संख्याही मर्यादित करण्यात आली आहे.

बाजार समितीत किती वाहनांना परवानगी?
भाजीपाला १५० वाहने
धान्य बाजार आवार ३०० वाहने
मसाला बाजार आवार २०० वाहने

गुरुवार २१ मे पासून सुरु होणाऱ्या फळे आणि कांदा बटाटा आवारातही वाहन प्रवेश मर्यादा निश्चित करण्यात आली आहे.

कांदा बटाटा बाजार-१०० वाहने
फळ बाजार आवार- २०० वाहने
अशीही माहिती आज प्रसिद्ध करण्यात आलेल्या प्रसिद्धी पत्रकात देण्यात आली आहे.

बाजार समितीच्या आवारातील कुणाला करोनाचा संसर्ग झाला तर तर बाजार समितीचे निर्यात भवन हे क्वारंटाइन सेंटर म्हणून सुरु करण्यात येईल असाही निर्णय घेण्यात आला असून यासाठी लागणारी सगळी आरोग्य विषयक सेवा नवी मुंबई महापालिकेद्वारे उपलब्ध करुन देण्यात येईल. तसेच तुर्भे येथील ट्रक टर्मिनलची जागा अधिग्रहित करुन बाजार समितीस पार्किंगसाठी देण्याचाही निर्णय घेण्यात आला आहे. बाजार आवारातले व्यवहार हे जास्तीत जास्त ऑनलाइन होण्याच्या दृष्टीने सभेत सादरीकरण करण्यात आले. व्यापाऱ्यांनीही ऑनलाइन व्यवहार करण्यास सहमती दर्शवली आहे. बाजार समितीने यासंदर्भातले सॉफ्टवेअर लवकरात लवकर उपलब्ध करुन द्यावे असे आदेश विभागीय आयुक्तांनी दिली आहेत.