27 June 2019

News Flash

आर्थिक घोटाळ्यांचा माग काढणाऱ्या अपूर्वा जोशींशी गप्पा..

‘व्हिवा लाऊंज’मध्ये करिअरची नवी वाट उलगडणार

‘व्हिवा लाऊंज’मध्ये करिअरची नवी वाट उलगडणार

देशभरातीलच नव्हे तर जगातील मोठमोठय़ा कंपन्या आणि बँकांमधील आर्थिक गैरव्यवहार शोधून काढण्यात अग्रेसर असलेले एक तरुण उमदे व्यक्तिमत्त्व म्हणजे अपूर्वा जोशी. वाणिज्य शाखेतील उच्चशिक्षण घेतल्यानंतर सरधोपट मार्ग निवडण्यापेक्षा न्यायवैद्यक लेखा परीक्षण (फॉरेन्सिक अकाऊंटिंग) क्षेत्राकडे वळलेल्या अपूर्वाने अल्पावधीतच या क्षेत्रात उद्योजिका म्हणून भरारी घेतली.

फॉरेन्सिक अकाऊंटिंग म्हणजे काय, याची फारशी माहिती सर्वसामान्यांमध्ये नाही आणि तरीही लोकांच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या या कामाचे स्वरूप काय, यासाठी कोणता अभ्यासक्रम करावा लागतो इथपासून ते प्रत्यक्ष कामातील अनुभव अशा नानाविध विषयांवर अपूर्वा जोशी यांच्याशी ‘केसरी टूर्स’ प्रस्तुत ‘व्हिवा लाऊंज’मध्ये गप्पा रंगणार आहेत.

कला, विज्ञान-तंत्रज्ञान अशा वेगवेगळ्या क्षेत्रांत कर्तृत्वाच्या जोरावर भरारी घेणाऱ्या स्त्रियांचा प्रवास, त्यांचे विचार जाणून घेण्याचा प्रयत्न लोकसत्ता व्हिवा लाऊंज कार्यक्रमातून करण्यात येतो. पुणे येथील महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी बालशिक्षण मंदिर ऑडिटोरियम येथे २२ मे रोजी सायंकाळी ५.४५ वाजता होणाऱ्या व्हिवा लाऊंज कार्यक्रमात अपूर्वा जोशी यांच्याशी संवाद साधता येणार आहे. वाणिज्य शाखेतील पदव्युत्तर पदवी शिक्षण पूर्ण केल्यानंतर सनदी लेखापाल आणि कंपनी सचिव अभ्यासक्रमाची तयारी सुरू करणाऱ्या अपूर्वा यांना न्यायवैद्यक लेखा परीक्षण (फॉरेन्सिक अकाऊंटिंग) क्षेत्राची माहिती मिळाली. याच क्षेत्रात करिअरचा निर्णय घेतल्यानंतर अपूर्वा यांनी त्याविषयीचे दोन अभ्यासक्रम पूर्ण के ले. त्यानंतर अमेरिकेतूनही एक अभ्यासक्रम पूर्ण केला. या क्षेत्रात काम सुरू करत असतानाच ‘फ्रॉड एक्स्प्रेस’ ही स्वत:ची कंपनी सुरू केली. सध्या रिस्क प्रो मॅनेजमेन्ट कन्सल्टिंग या कंपनीच्या संचालक असलेल्या अपूर्वा या आज या क्षेत्रातील नामांकित तरुण उद्योजिका आहेत.

देशभरातील मोठमोठय़ा कंपन्या, बँकांमधून शिताफीने केले जाणारे आर्थिक गैरव्यवहार शोधून काढणे हे अपूर्वा यांचे  काम. फॉरेन्सिक अकाऊंटिंग या क्षेत्रात तज्ज्ञांची आज मोठय़ा प्रमाणावर गरज असून स्त्रियांचे या क्षेत्रातील प्रमाण अत्यल्प आहे, याकडे लक्ष वेधणाऱ्या अपूर्वा यांनी त्यासाठीच्या अभ्यासक्रमाची रचना करण्यातही महत्त्वाची भूमिका बजावली आहे. ज्या क्षेत्राची माहितीच नव्हती अशा अनवट क्षेत्राची वाट सापडल्यानंतर त्याचा सखोल अभ्यास करून त्यात घट्ट पाय रोवून उभ्या राहणाऱ्या अपूर्वा यांच्याशी संवाद साधण्याची संधी व्हिवा लाऊंजच्या निमित्ताने मिळणार आहे.

  • कधी- बुधवार, २२ मे २०१९
  • कुठे- महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी बालशिक्षण मंदिर ऑडिटोरियम, मयूर कॉलनी, कोथरूड, पुणे
  • वेळ- सायं. ५.४५ वाजता

प्रथम येणाऱ्यास प्राधान्य.

फॉरेन्सिक अकाऊंटिंग म्हणजे काय? त्याचा अभ्यासक्रम आणि पुढे काम करण्यासाठी असलेल्या संधी याचबरोबरीने तिचे अनुभव अशा नानाविध विषयांवर अपूर्वाशी गप्पाष्टक रंगणार आहे..

First Published on May 19, 2019 2:11 am

Web Title: apoorva joshi in loksatta viva lounge