मद्यधुंद अवस्थेत गाडी चालवून एकाच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी अभिनेता सलमान खानला उच्च न्यायालयाने त्याच्यावर ठेवण्यात आलेल्या सर्व आरोपांतून निर्दोष मुक्त केले. तसेच सत्र न्यायालयाने त्याला सुनावलेली पाच वर्षांची शिक्षाही रद्द केली. या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देता येऊ शकेल, अशी शिफारस करणारा अहवाल सरकारी वकिलांकडून शुक्रवारी गृहमंत्रालयाकडे पाठविण्यात आला. याबाबत महाधिवक्त्यांशी विचारविनिमय केल्यावर पुढील आठवडय़ात त्याबाबत अंतिम निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती सूत्रांतर्फे देण्यात आली.
निकालाच्या प्रतीची वाट पाहत आहोत. त्यात नेमके काय म्हटले आहे याचा अभ्यास करून पुढे काय याबाबतचा अभिप्राय राज्य सरकारला दिला जाईल, असे निकालानंतर मुख्य सरकारी वकील संदीप शिंदे यांनी सांगितले होते.
बुधवारी निकालाची प्रत उपलब्ध झाल्यावर त्याचा अभ्यास करून निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात अपील करायचे की नाही याबाबतच्या अभिप्रायाचा अहवाल गृहमंत्रालयाकडे पाठवला आहे, अशी माहिती शिंदे यांनी दिली. मात्र सध्या विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरू असल्याने आपण नेमका काय अभिप्राय दिला हे सांगण्यास शिंदे यांनी नकार दिला.