मुंबईवर आदळणारे लोकसंख्येचे लोंढे रोखता यावेत म्हणून निर्माण करण्यात आलेल्या नवी मुंबईत पिण्याचे मुबलक पाणी, डम्पिंग ग्राऊन्ड, सुसज्ज रस्ते, विस्तीर्ण उद्याने, उत्कृष्ट शिक्षण अशा अनेक सुविधा असल्या तरी तिथे पार्किंग, कचरा वाहतूक, अनधिकृत धार्मिक स्थळे, बेकायदेशीर बांधकामे, झोपडपट्टय़ांचा विळखा यासारख्या प्रमुख समस्या चांगल्या शहराची स्वप्ने धुळीस मिळवणारी आहेत. त्यामुळे बुधवारी मतदानासाठी जाताना नवी मुंबईकर मतदार याचा गंभीरपणे विचार करून आपला हक्का बजावावा, असे आवाहन शहरातील जागरूक आणि जबाबदार नागरिकांनी केले आहे.
नवी मुंबईची निर्मिती करताना शहरात पार्किंगची पुरेशी व्यवस्था, झोपडय़ांवर पायबंद, आणि अनधिकृत बांधकामांना रोखले जाईल, असे अपेक्षित होते. पण गेल्या ४५ वर्षांत नेमके याच्या उलट असून पालिका आल्यानंतर अनधिकृत बाबींचा वेग वाढला, असा अनुभव येत आहे. या शहरातील गरीब, कष्टकरी, मजूर कधी चारचाकी वाहन घेईल, असा अंदाज न बांधलेल्या सिडकोच्या अधिकाऱ्यांना अल्प उत्पन्न गटातील रहिवाशांसाठी कधी पार्किंगची जागाच राखीव ठेवली नाही. त्यामुळे शहरात नोंद झालेल्या २ लाख ५७ हजार वाहनांपैकी एक लाख ३५ हजार वाहने ही रात्रंदिवस रस्त्याच्या कडेला उभी आहेत. केवळ कागदावर सुनियोजित शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नवी मुंबईत पार्किंग हा अत्यंत भयंकर प्रश्न भविष्यात निर्माण होणार आहे. स्वच्छतेचे पाच पुरस्कार पटकावलेल्या पालिका क्षेत्रातील अर्धा भागात आज उघडय़ावर कचरा वाहतूक केली जात असून शहराची लक्तरे वेशीवर टांगणारी दृश्य दररोज नागरिक पाहत आहेत. त्यामुळे शहराच्या विकासासाठी मतदारांनी जागरूकपणे मतदान करावे, असे आवाहन जबाबदार नागरिकांनी केले आहे.

पैसे वाटणाऱ्या महिलेला अटक
महापालिकेच्या अधिकारीपदाचा राजीनामा देऊन निवडणूक लढवणारे शिवसेनेचे उमेदवार संजू वाडे यांच्यातर्फे मतदारांना पैसे वाटणाऱ्या महिलेला मंगळवारी पोलिसांनी ताब्यात घेतले. सुमन पेणकर असे या महिलेचे नाव आहे. त्यांच्याकडे साडेसात हजार रुपये आढळून आले. सोमवारी प्रचार संपल्यानंतर त्या पैसे वाटप करत होत्या.
विकास महाडिक, नवी मुंबई</strong>