अॅपल कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) टीम कूक यांनी मुंबईतील श्री सिद्धिविनायक मंदिरात गणरायाचे दर्शन घेतले. बुधवारी पहाटेच्या काकड आरतीला ते गणरायाच्या दर्शनासाठी उपस्थित होते. यावेळी कूक यांच्यासोबत अॅपल इंडियाचे प्रमुख संजय कौल आणि इतर वरिष्ठ अधिकारी देखील होते. याशिवाय, कूक यांनी रिलायन्स उद्योग समूहाचे प्रमुख मुकेश अंबानी यांचा मुलगा अनंत अंबानीचीही मंदिरात भेट घेतली. अनंत अंबानी हे सिद्धिविनायकाच्या दर्शनासाठी येत असतात. यादरम्यान या दोघांची भेट झाली.
अॅपल कंपनी भारतात बंगळुरू येथे अॅप डिझाईन आणि डेव्हलपमेंट सेंटर उभारणार आहे. या सेंटरचे उदघाटन कूक यांच्या हस्ते केले जाणार आहे. कूक पंतप्रधान नरेंद्र मोदींचीही भेट घेणार आहेत.