९९ रुपये प्रतिमाह दराने अ‍ॅपलधारकांना आजपासून सेवा

लोकांच्या मनोरंजनविश्वात परवलीचा शब्द बनू पाहणाऱ्या ‘ओटीटी प्लॅटफॉम्र्स’वर आता तंत्रज्ञान क्षेत्रातील अग्रणी समजल्या जाणाऱ्या ‘अ‍ॅपल ’ कंपनीनेही उडी घेतली आहे. शुक्रवारपासून ‘अ‍ॅपल टीव्ही’ या नव्या सेवेचा शुभारंभ होणार असून नेटफ्लिक्स, अ‍ॅमेझॉन प्राइम या आघाडीच्या सेवांना टक्कर देत आपला ब्रॅण्ड पुढे नेण्याच्या इराद्याने स्पर्धेत उतरलेल्या अ‍ॅपलने ९९ रुपये प्रतिमाह इतक्या माफक दरात ही सेवा देऊ केली आहे.

‘अ‍ॅपल टीव्ही’च्या आगमनाने या क्षेत्रातील स्पर्धा अधिकच तीव्र होणार अशी चर्चा असली तरी अ‍ॅपल कंपनीकडे सुरुवातीला मनोरंजनाचा पर्याय इतरांच्या तुलनेत अगदीच मर्यादित आहे. त्यामुळे मोठा गाजावाजा करत येणारा ‘अ‍ॅपल टीव्ही’ प्रेक्षकांना अधिक काय देणार, याबद्दल लोकांमध्ये अधिक कुतूहल आहे.

अ‍ॅपलसारखी दिग्गज कंपनी ओटीटी क्षेत्रात उतरली असल्याने एकूणच चुरस वाढली आहे, मात्र यावर अधिकाधिक काय पाहता येणार याबद्दल लोकांमध्ये उत्सुकता आहे. सध्यातरी यावर विविध विषयावरील आठ अगदी नव्याकोऱ्या मालिका, चित्रपट आणि लघुपट दाखवण्यात येणार आहेत. पहिल्यांदा तीन मालिका दाखवल्या जाणार असून दर महिन्याला एक नवीन मनोरंजन पर्याय दाखल होणार असल्याचे सांगितले जाते. जेनिफर अ‍ॅनिस्टनची मुख्य भूमिका असलेला ‘द मॉर्निग शो’ हा सध्या आकर्षणाचा विषय आहे. शिवाय, जॅसन मोमोआ आणि अ‍ॅल्फ्रे वुडार्ड यांचा ‘सी’, एमिली डिकन्सन यांचा ‘डिकन्सन’, ‘एलिफंट क्वीन’ आदी माहितीपट आधी प्रदर्शित केले जाणार आहेत. तसेच स्टीव्हन स्पीलबर्ग यांनाही अ‍ॅपलने करारबद्ध केले असून त्यांच्या ‘अमेझिंग स्टोरीज’ बरोबर दिग्दर्शक नाईट श्यामलनसारख्या काही प्रतिभावान दिग्दर्शकांचे चित्रपट ‘अ‍ॅपल टीव्ही’वर पाहता येणार आहेत. मनोरंजनात्मक पर्यायाचा संग्रह ‘अ‍ॅपल’कडे सध्या मोठय़ा प्रमाणात नसल्याने त्यांनी गेमिंगवरही लक्ष केंद्रित केले असून अ‍ॅपलने कोनामी, कॅपकॉमसारख्या इंटरअ‍ॅक्टीव्ह  गेमिंग कंपन्यांशी करार केला आहे. या माध्यमातून अ‍ॅपलच्या ग्राहकांना गेमचाही आनंद लुटता येणार आहे.

देशात अ‍ॅपलसह एचबीओ मॅक्स, फ्लिपकार्ट, डिस्ने प्लस आणि ईएसपीएनदेखील स्पर्धेत उतरत आहेत.

अ‍ॅपलची प्लस ही सुविधा फक्त अ‍ॅपलच्या ग्राहकांसारखी मर्यादित असल्याने अँड्रॉइड वापरकर्त्यांना या सुविधेचा लाभ घेता येणार नाही. ओटीटीच्या स्पर्धेत टिकून राहण्यासाठी भारतीय प्रेक्षकांसाठी कोणत्या वेब सिरीज, चित्रपट आणि माहितीपट तयार करणार याबाबत प्रेक्षकांमध्ये उत्कंठा आहे.

ग्राहकांसाठी काय?

‘अ‍ॅपल टीव्ही’चा लाभ अ‍ॅपल वापरकर्त्यांंना १ नोव्हेंबरपासून घेता येणार आहे. सुरुवातीचे सात दिवस ग्राहकांना ही सेवा मोफत मिळवता येणार आहे. याशिवाय, ‘अ‍ॅपल टीव्ही’ अ‍ॅपलचे मोबाइल, मॅकबुकवर पाहता येणार आहे. अ‍ॅपल कंपनीने ‘अ‍ॅमेझॉन फायर टीव्ही’, ‘सॅमसंग’ आणि ‘सोनी’ कंपनीशी करार केला असल्याने यावरही ‘अ‍ॅपल टीव्ही’ची सुविधा अनुभवता येणार आहे. ९९ रुपये किंमत असणारा ‘अ‍ॅपल टीव्ही’ सहा सदस्यांना पाहता येणार असून नवीन आयफोन आणि आयपॅड खरेदी करणाऱ्या ग्राहकांना अ‍ॅपलने वर्षभरासाठी ही सुविधा मोफत देऊ केली आहे.