मानसिंग रावत, पी. विवेकानंदन, अ‍ॅनी फेरर, डॉ. कसाई यांना बजाज पुरस्कार प्रदान
महात्मा गांधींच्या वैश्विक विचारांची जोपासना करणाऱ्या आणि समाजाच्या उन्नतीचे कार्य निरलसपणे करणाऱ्या समाजातील चार व्यक्तिमत्त्वांना मंगळवारी जमनालाल बजाज पुरस्काराने गौरवण्यात आले. ख्यातनाम इतिहासकार आणि महात्मा गांधी यांचे नातू प्रा. राजमोहन गांधी यांच्या हस्ते हा पुरस्कार मानसिंह रावत, पी. विवेकानंदन, अ‍ॅनी फेरर आणि डॉ. मिनोरू कसाई यांना प्रदान करण्यात आला. मानपत्र, सन्मानचिन्ह आणि १० लाख रुपये असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. एनसीपीए येथील जमशेद भाभा सभागृहात झालेल्या या कार्यक्रमासाठी बजाज ग्रुपचे अध्यक्ष राहुल बजाज आणि जमनालाल बजाज फाउंडेशनचे अध्यक्ष व माजी न्यायमूर्ती चंद्रशेखर धर्माधिकारी उपस्थित होते.
‘विधायक कार्यासाठी अमूल्य योगदान’ या श्रेणीतील पुरस्काराचे यंदाचे मानकरी म्हणून उत्तराखंड येथील सवरेदय कार्यकर्ते मानसिंह रावत यांची निवड करण्यात आली. गढवाल जिल्ह्य़ातील लोकांच्या आर्थिक आणि सामाजिक उन्नतीसाठी रावत यांनी मोठे काम केले आहे. ‘ग्रामविकासासाठी विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा वापर’ या श्रेणीसाठी यंदा ‘सस्टेनेबल अ‍ॅग्रीकल्चर अ‍ॅण्ड एन्व्हायर्नमेण्टल व्हॉलेंटरी अ‍ॅक्शन’ (सेवा) या संस्थेचे संस्थापक पेरूमल विवेकानंदन यांना हा पुरस्कार मिळाला. कृषि क्षेत्रात पदव्युत्तर शिक्षण घेतलेल्या पेरूमल विवेकानंदन यांनी १९८७मध्ये नोकरी सोडून सेवाभावी संस्थांसह काम करण्यास सुरुवात केली. १९९२मध्ये त्यांनी स्वत:च्या ‘सेवा’ या संस्थेची स्थापना करून तामिळनाडू येथील शेतकऱ्यांच्या विकासासाठी काम केले आहे.

जानकीदेवी बजाज यांच्या स्मरणार्थ देण्यात येणाऱ्या ‘महिला व बाल कल्याण व विकास’ या श्रेणीतील पुरस्कारासाठी यंदा आंध्र प्रदेशात काम करणाऱ्या अ‍ॅनी फेरर यांची निवड झाली. इंग्लंडमध्ये जन्मलेल्या अ‍ॅनी यांनी मुंबईत येऊन पत्रकारितेची पदवी घेतली. त्यानंतर आपल्या पतीबरोबर आंध्र प्रदेशातील अनंतपुरम् या दुष्काळी भागात येऊन समाजातील सर्वात खालच्या थरातील लोकांसाठी त्यांनी काम करण्यास सुरुवात केली. त्यासाठी त्यांनी ‘रूरल डेव्हलपमेण्ट ट्रस्ट’ची स्थापना केली. आईकडून मुलाला होणारी एचआयव्हीची लागण रोखण्यासाठी त्यांनी मोलाचे कार्य केले असून त्यांना यशही आले आहे. तर, ‘गांधीवादाचा परदेशात प्रचार’ या श्रेणीतील पुरस्कार यंदा जपानमधील इंटल क्रिश्चन विद्यापीठाच्या डॉ. मिनोरू कसाई यांना प्रदान करण्यात आला.
जमनालाल बजाज पुरस्काराने मंगळवारी मान्यवरांना गौरवण्यात आले.