करोनामुळे शासकीय नोकरभरतीवर लागू केलेले निर्बंध शिथिल करण्यात आले असून, सुमारे पाच हजार पोलीस शिपाई पदे भरण्यास राज्य शासनाने मान्यता दिली आहे. भरती प्रक्रिया लवकरच सुरू करण्यात येणार आहे. दुसऱ्या टप्प्यात सात हजार पोलिसांची रिक्त पदे भरण्यात येणार आहेत, असे गृह विभागाच्या शासन आदेशात म्हटले आहे.

करोना साथरोगाचा मुकाबला करण्यासाठी मागील मार्चमध्ये राज्यात टाळेबंदी लागू करण्यात आली. त्यामुळे सर्व आर्थिक व्यवहार ठप्प झाल्यामुळे राज्याची वित्तीय व्यवस्थाही कोलमडून पडली. त्यामुळे राज्य शासनाने शासकीय नोकरभरतीवर निर्बंध लागू करण्याचा निर्णय घेतला. वित्त विभागाने ४ मे २०२० रोजी तसा शासन आदेश काढला होता.

राज्य पोलीस दलात मोठय़ा प्रमाणावर शिपाई संवर्गातील पदे रिक्त आहेत. कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने ही पदे भरणे महत्त्वाचे आहे, असे शासनाचे मत झाले. २०१९ मध्ये ५,२९७ पदे रिक्त झाली आहेत. जानेवारी ते डिसेंबर २०२० मध्ये सेवानिवृत्त, पदोन्नती, राजीनामे, इत्यादी कारणास्तव पोलीस शिपाई, वाहनचालक, सशस्त्र पोलीस शिपाई संवर्गातील ६,७२६ पदे रिक्त झाली आहेत. त्याचबरोबर मीरा-भाईंदर-वसई-विरार पोलीस आयुक्तालयासाठी पहिल्या टप्प्यात ५०५ पोलीस शिपाई पदे भरावयाची आहेत. यानुसार एकूण १२ हजार ५२८ पोलीस शिपाई संवर्गातील पदे रिक्त असून ही सर्व पदे भरण्याचा शासनाचा प्रस्ताव आहे.

राज्य शासनाने आता पोलीस भरतीला नोकरभरतीच्या निर्बंधातून सूट दिली आहे. त्यानुसार पहिल्या टप्प्यात ५,२९७ पोलीस शिपाई पदांची भरती करण्यात येणार आहे. गृह विभागाने त्यासंबंधीचा नव्याने शासन आदेश काढला आहे. दुसऱ्या टप्प्यात ७२३१ पदे भरण्याबाबत स्वतंत्र आदेश काढण्यात येईल, असे गृह विभागाने म्हटले आहे.