मुंबई : भारत पेट्रोलियमच्या मुंबईतील रिफायनरी परिसरात जम्बो करोना उपचार केंद्र्र उभारण्यास केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे. पीएम केअर फंडातून नवीन प्राणवायू प्रकल्पांना निधी देण्यात आला असून राज्याच्या प्राणवायू पुरवठ्यातही वाढ करण्यात आली आहे.

राज्य सरकारच्या विनंतीनुसार भारत पेट्रोलियमच्या जागेतील करोना केंद्रास मंजुरी दिल्याबद्दल आणि नवीन प्राणवायू प्रकल्प व पुरवठ्यातही वाढ केल्याने विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पेट्रोलियममंत्री धर्मेंद्र प्रधान यांचे आभार मानले आहेत.

मुंबईतील नवीन करोना केंद्र्राला अखंडित प्राणवायू पुरवठा करण्याची तयारीही भारत पेट्रोलियमने दर्शविली आहे. त्यामुळे प्राणवायूची सोय असलेल्या हजारो रुग्णशय्या येथे उपलब्ध होऊन करोनाच्या रुग्णांवर उपचार होऊ शकतील.

भारत पेट्रोलियमचे संचालक अरुणसिंग यांच्याशी या संदर्भात चर्चाही झाली. राज्य सरकारने कम्प्रेसरची व्यवस्था केल्यास प्राणवायूच्या टाक्या भरून देण्याची तयारीही त्यांनी दाखविली आहे. त्यामुळे प्राणवायूचा तुटवडा कमी होण्यास मदत होईल आणि रुग्णांचा जीव वाचू शकेल, असे फडणवीस यांनी नमूद केले.

पीएम केअर्सच्या माध्यमातून २०१ कोटी ५८ लाख रुपये देऊन देशात १६२ पीएसए वैद्यकीय प्राणवायू प्रकल्पांचे काम यापूर्वी सुरू करण्यात आले होते. त्यात आता आणखी ५५१ अशा प्रकल्पांची भर पडणार आहे. प्रत्येक जिल्हा मुख्यालयी आणि सार्वजनिक आरोग्य सुविधेच्या ठिकाणी हे प्रकल्प सुरू करण्यास मंजुरी देऊन पंतप्रधान मोदी यांनी आरोग्य व्यवस्था बळकट करण्यासाठी एक मोठे पाऊल उचलले आहे,असे फडणवीस यांनी नमूद केले.

महाराष्ट्राला सर्वाधिक म्हणजे एक हजार ७८५ मेट्रिक टन प्राणवायूचा पुरवठा करण्यात येत असून गुजरात, उत्तर प्रदेश, कर्नाटक, मध्य प्रदेश यांच्यासह कोणत्याही प्रमुख राज्याशी तुलना केली तर तो दुपटीहून अधिक आहे, असे फडणवीस यांनी स्पष्ट केले.