राज्य सरकारचा विचार; १२५ कोटी रुपयांच्या निधीची लवकरच तरतूद

मुंबई : गोरगरिबांना १० रुपयांत सकस जेवण देण्यासाठी शिवसेनेच्या संकल्पनेतून सुरू झालेल्या शिवभोजन योजनेत पहिल्या दोन दिवसांत २५ हजार जणांनी थाळीचा लाभ घेत चांगला प्रतिसाद दिल्याने आता नवीन आर्थिक वर्षांपासून म्हणजेच एप्रिलपासून योजनेची व्याप्ती वाढवत रोज एक लाख जणांना शिवभोजनाचा लाभ देण्याचा राज्य सरकारचा विचार आहे. त्यासाठी वर्षांला १२५ कोटी रुपयांच्या निधीची तरतूद करण्यासाठी महाविकास आघाडी सरकारने तयारी सुरू केली आहे.

प्रजासत्ताकदिनी ३६ जिल्ह्य़ांतील ५० केंद्रांत प्रायोगिक तत्त्वावर शिवभोजन योजनेचा आरंभ झाला. पहिल्या दोन दिवसांत या केंद्रांतून २५ हजार लाभार्थ्यांनी थाळीचा आस्वाद घेतला. पहिल्या दिवशी ११ हजार ४०० थाळी, तर दुसऱ्या दिवशी १३ हजार ५०० हून अधिक थाळींचा आस्वाद राज्यातील लोकांनी घेतला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी कोल्हापूर आणि नंदुरबार येथील शिवभोजन केंद्रात जेवणासाठी आलेल्या सर्वसामान्य लोकांशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून थेट संवाद साधला. या वेळी अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ, विभागाचे प्रधान सचिव महेश पाठक आणि इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर आपल्या कल्पनेतील शिवभोजन योजनेचा स्वीकार सहभागी काँग्रेस व राष्ट्रवादी या दोन्ही सहकारी पक्षांनी केला व त्यास पाठिंबा दिल्याचे समाधान असल्याचे मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले.

या योजनेला लोकांचा मिळालेला प्रतिसाद पाहून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी समाधान व्यक्त केले आहे. सध्या मार्चपर्यंतच्या तीन महिन्यांसाठी राज्यातील ५० केंद्रांवरून शिवभोजन देण्यासाठी साडेसहा कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती. आता ही योजना ५०० केंद्रांपर्यंत वाढवून दररोज एक लाख थाळी देण्याचा विचार सुरू झाला आहे. त्यासाठी वार्षिक १२५ कोटी रुपयांची तरतूद करण्याची तयारी असल्याचे उच्चपदस्थांनी सांगितले.

शिवभोजन योजनेतील थाळीला प्रचंड प्रतिसाद मिळत असून मागणी खूप मोठी आहे, त्यामुळे भविष्यात योजनेची व्याप्ती वाढवावी लागेल असे मत अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केले. गरीबांना याचा खूप लाभ होत असल्याचे भुजबळ म्हणाले. दुपारी १२ वाजताच शिवभोजन केंद्रावर जेवणासाठी रांग लागते, एवढा प्रचंड प्रतिसाद मिळत असल्याची माहिती विभागाचे प्रधान सचिव महेश पाठक यांनी दिली. ‘शिवभोजन अ‍ॅप’च्या माध्यमातून दररोज प्रत्येक जिल्ह्य़ातील योजनेचे लाभार्थी आणि इतर माहितीचा आढावा घेत असल्याचेही त्यांनी सांगितले.

मुख्यमंत्र्यांचा लाभार्थ्यांशी संवाद

  • काय ताई, काय दादा, जेवायला सुरुवात केली का, जेवणाबाबत समाधानी आहात ना, जेवण ठीक आहे का, चव चांगली आहे ना, जेवण आवडले की नाही, काही सूचना असल्या तर मनमोकळेपणाने सांगा, अशी विचारणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लाभार्थ्यांना केली. त्यावर ‘साहेब, एरवी जेवायला ५० रुपये लागायचे, आता १० रुपयांत जेवण होते.. तुम्ही शिवभोजन थाळी सुरू केल्याने आमची खूप चांगली सोय झाली!’ असे नंदुरबारच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये हमाल म्हणून काम करणाऱ्या योगेश शिंदे यांनी मुख्यमंत्र्यांना सांगितले. थेट आमच्याशी बोलून आमची चौकशी करत असल्याबद्दलचा आनंदही त्यांनी या वेळी व्यक्त केला. जिल्हाधिकारी राजेंद्र भारुड, केंद्राचे सचिव योगेश अमृतकर यांच्याशीही मुख्यमंत्री बोलले. केंद्रातील सुविधा आणि येणारा अनुभव मुख्यमंत्र्यांनी त्यांच्याकडून जाणून घेतला.
  •  मुख्यमंत्र्यांनी कोल्हापूरच्या रुद्राक्षी स्वयं महिला बचत गटाच्या अण्णा रेस्टारंटच्या अध्यक्ष राजश्री सोलापुरे यांच्याशी, तसेच त्यांनी सुरू केलेल्या शिवभोजन केंद्रातील लोकांशी संवाद साधला. हा सरकारचा खूप अभिनव उपक्रम आहे, तुमची कल्पना खूप छान आहे. लोकांचा खूप चांगला प्रतिसाद आहे, आतापर्यंत दररोज १५० थाळ्या गेल्या, अशी माहिती राजश्री सोलापुरे यांनी मुख्यमंत्र्यांना दिली. केंद्रात ७२ लोकांना जेवणास बसण्याची सोय असून, रुग्णालयाच्या आवारात हे केंद्र सुरू झाल्याने गोरगरीब जनतेला या थाळीचा लाभ मिळत असल्याचेही त्यांनी आवर्जून सांगितले.