News Flash

मानवी हस्तक्षेपामुळे जलजीवन अडचणीत

‘डॉल्फिन, देवमासा यांसारखे सस्तन प्राणी एखादे भक्ष्य सापडल्यास किंवा स्थलांतर करताना एकमेकांशी संवाद साधतात.

|| नमिता धुरी

बोटींची वर्दळ, मासेमारी, जलक्रीडा यांमुळे धोका; विविध जलचरांचा अधिवास धोक्यात

मुंबई : आधुनिकीकरणाच्या प्रक्रियेत होणाऱ्या जंगलतोडीमुळे मानव आणि वन्यजीव यांच्यात वारंवार संघर्ष घडून येत असताना आता समुद्रातील जीवसृष्टीही मानवी हस्तक्षेपामुळे ढवळून निघाली आहे. बोटींची ये-जा, मासेमारी आणि जलक्रीडा प्रकारांमुळे समुद्रातील विविध जलचरांचा अधिवास धोक्यात आला आहे.

‘अनेक मच्छीमार पारंपरिक पद्धतीने मासेमारी करतात. समुद्रातील हव्या त्याच गोष्टी ते सोबत नेतात. परंतु गेल्या काही वर्षांत वेगळ्या पद्धतीचे जाळे वापरून व्यावसायिक मासेमारी करण्यात येत आहे. यात वापरल्या जाणाऱ्या जाळ्यामुळे समुद्रतळ खरवडून निघतो. त्यामुळे समुद्री कासवांचे खाद्य असलेले समुद्री गवत नाहीसे होते. यात बऱ्याचदा परदेशी मच्छीमारांचा सहभाग असतो. २-३ वर्षांपूर्वी चिनी मच्छीमारांच्या ५ बोटी दाभोळ येथे स्थानिकांनी पकडल्या होत्या,’ अशी माहिती कांदळवन प्रतिष्ठानचे उपजीविका समन्वयक मोहन उपाध्ये यांनी दिली.

बोटींच्या खाली असणाऱ्या पंख्यांमुळे अनेकदा कासवांचे पंख कापले जातात. बोटींना धडकू न त्यांच्या टणक पाठीला तडे जातात. जेलीफिश हे समुद्री कासवांचे आवडते खाद्य आहे. समुद्राच्या पाण्यावर तरंगणाऱ्या प्लास्टिकच्या पिशव्या जेलीफिशसारख्या दिसत असल्याने त्या खाण्याकडे कासवांचा कल असतो. मृत पावलेल्या अनेक कासवांच्या पोटात प्लास्टिक आढळून आले आहे. मुंबईच्या किनाऱ्यावरही काही वेळा मृत डॉल्फिन आढळतात. ते समुद्रात मृत होऊन नंतर किनाऱ्यावर आल्याने त्यांचे शव खराब झालेले असते. अशा वेळी डॉल्फिनचा मृत्यू नेमका कशामुळे झाला या कारणाचा शोधही घेता येत नाही.

‘डॉल्फिन, देवमासा यांसारखे सस्तन प्राणी एखादे भक्ष्य सापडल्यास किंवा स्थलांतर करताना एकमेकांशी संवाद साधतात. त्यासाठी ते ध्वनिलहरींचा वापर करतात. बोटींचा भोंगा, पंखे यांमुळे ध्वनिलहरींमध्ये अडथळे निर्माण होतात. तसेच मासेमारी करताना तुटलेले जाळे पाण्यातच तरंगत राहिल्यास त्यात अडकू न जलचर जखमी होतात. जहाजांमधून गळणाऱ्या तेलाचाही त्यांच्या शरीरावर दुष्परिणाम होतो,’ असे जलजीवशास्त्रज्ञ स्वप्निल तांडेल यांनी सांगितले.

 

स्कू बा डायव्हिंगमध्ये सहभागी होणारे काही पाणबुडे माशांना आकर्षित करण्यासाठी त्यांना खाद्य देतात जे माशांसाठी हानिकारक ठरू शकते. तसेच प्रवाळांवर उभे राहिल्यासही त्यांचे नुकसान होते. प्रवाळांच्या वाढीसाठी हजारो वर्षे लागतात. पॅरासेलिंग, जेट स्की यांसारख्या खेळांमध्ये जास्त ऊर्जेची यंत्रे वापरली जातात. त्यांचे आवाज जलचरांसाठी त्रासदायक ठरतात. त्यामुळे बऱ्याचदा जलचर संबंधित जागा सोडून अन्य ठिकाणी जातात. डॉल्फिन, देवमासे, पॉरपॉइज, डूगाँग्ज, समुद्री सर्प यांसारखे प्राणी मच्छीमारांच्या जाळ्यात सापडतात. -मिहीर सुळे, जलजीवशास्त्रज्ञ

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 22, 2021 12:15 am

Web Title: aquatic life in danger due to human intervention akp 94
Next Stories
1 बीडीडी चाळवासीयांच्या मागण्या अखेर मान्य!
2 पुनर्विकास देखरेखीच्या जबाबदारीस म्हाडा अभियंत्यांची टाळाटाळ
3 बेपत्ता तरुणाच्या हत्येची उकल
Just Now!
X