बॉलिवूडचा दबंग सलमान खानचा भाऊ अरबाज खानला आयपीएल सट्टेबाजी प्रकरणात ठाणे पोलिसांनी समन्स बजावले आहे. शुक्रवारी सकाळी अरबाज खानच्या वांद्रे येथील निवासस्थानी समन्स पाठवण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. ठाणे पोलिसांनी शनिवारी अरबाजला चौकशीसाठी हजर होण्यास सांगितल्याचे वृत्त टाइम्स नाऊने दिले आहे.

दोन दिवसापूर्वीच ठाणे पोलिसांच्या खंडणीविरोधी पथकाने कुप्रसिद्ध सट्टेबाज सोनू जालानला अटक केली होती. त्याच्या चौकशीतून अरबाज खानचे नाव समोर आले. सोनू जालान अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा माणूस असल्याचे म्हटले जाते. सट्टेबाजीमध्ये अरबाजला २.८ कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचे टाइम्स नाऊने म्हटले आहे. अरबाज सोनू जालानला ३ कोटी रुपये देणे होता. त्यावरुन दोघांमध्ये वाद सुरु होता. पैसे दिले नाहीस तर नाव उघड करण्याची धमकी सोनूने अरबाजला दिली होती असे टाइम्स नाऊने आपल्या वृत्तात म्हटले आहे. १५ मे रोजी डोंबिवलीतून सट्टेबाजी रॅकेट चालवणाऱ्या चौघांना अटक करण्यात आली होती.

भारतातील सट्टा बाजारातील मोठे नाव असलेला कुप्रसिद्ध सट्टेबाज सोनू जालान याला ठाणे पोलिसांच्या खंडणीविरोधी पथकाने २९ मे रोजी अटक केली आहे. अल जझीरा या परदेशी वृत्तवाहिनीने कथित स्टिंग ऑपरेशनद्वारे भारताने क्रिकेट कसोटी सामने फिक्स केल्याचा दावा केला होता. त्यामुळे क्रिकेट क्षेत्रात एकच खळबळ उडाली होती. या पार्श्वभूमीवर सोनू जालानची अटक ही पहिली कारवाई असून त्याच्याकडे कसून चौकशी सुरु आहे. यात अनेक धक्कादायक माहिती उघड होण्याची शक्यता पोलिस सुत्रांकडून वर्तवण्यात येत आहे.

सोनू जालान हा मुंबईच्या सट्टा बाजारातील मोठा सट्टेबाज असून त्याचे परदेशात अनेक ग्राहक आहेत. यांपैकी अफगाणिस्तान, पाकिस्तान, दक्षिण अफ्रिका आणि सौदी अरेबिया या ठिकाणच्या ग्राहकांशी तो संपर्कात असतो. तर भारतातही त्याची मोठी टोळी असून ते दिल्ली, कोलकाता, राजस्थान, गुजरात, हरयाणा येथून त्याचे साथीदार सट्टा खेळतात. सोनू जालान कांदिवली (प) येथील अगरवाल रेसिडन्सी येथे राहत असून त्याला मुंबई पोलिसांनी अनेकदा क्रिकेट सामन्यांवर सट्टे लावल्याने अटक केली आहे.