संदीप आचार्य

मुंबईतील पंचतारांकित रुग्णालये तसेच कोणत्याही खासगी रुग्णालयांना यापुढे लक्षणे नसलेले करोना रुग्ण परस्पर दाखल करण्यास मुंबई महापालिकेने बंदी घातली आहे. या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या रुग्णालयांवर कारवाई केली जाईल, असे पालिका आयुक्त इक्बाल सिंग चहेल यांनी स्पष्ट केले आहे.

आरोग्य विभागाने २१ मे रोजी साथरोग कायदा १८९७ अंतर्गत आदेश काढून सर्व खासगी रुग्णालयांतील ८० टक्के खाटा करोना रुग्णांसाठी राखीव ठेवण्यास सांगितले. मात्र बहुतेक रुग्णालयांनी याचे पालन तर केले नाहीच उलट परस्पर खासगी प्रयोगशाळांतून करोना रुग्णांचे अहवाल मिळवून आपल्या रुग्णालयात लक्षण नसलेले करोना रुग्ण दाखल करण्याचा सपाटा लावून पैसे मिळवायचे नवे तंत्र विकसित केले. लक्षणे नसलेल्या करोना रुग्णांना करोनासाठी राखीव असलेल्या रुग्णालयात दाखल करू नये, अशी ‘आयसीएमआर’ची सुस्पष्ट मार्गदर्शन तत्त्वे असताना बहुतेक रुग्णालयांनी तीही धाब्यावर बसवली आहेत. कालपर्यंत मुंबई महापालिकेने खासगी रुग्णालयातील ८० खाटांही ताब्यात घेतल्या नव्हत्या आणि ‘आयसीएमआर’ची मार्गदर्शक तत्त्वे धाब्यावर बसविणाऱ्या एकाही रुग्णालयावर कारवाई केलेली नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी खासगी रुग्णालयातील खाटा ताब्यात घेण्याचे आदेश दिल्यानंतर महापालिका आयुक्त इक्बालसिंग यांनी ३५ खासगी रुग्णालयातील खाटा ताब्यात घेतल्या असून विभाग पातळीवरील नर्सिग होममधील खाटा विभाग अधिकाऱ्यांना ताब्यात घेण्यास सांगितले आहे. त्यानुसार सध्या पालिकेच्या ताब्यात तीन हजारांहून अधिक खाटा आहेत. मात्र यातील बहुतेक खाटांवर ही खासगी रुग्णालये परस्पर लक्षणे नसलेल्या करोना रुग्णांना दाखल करत आहेत. यासाठी खासगी प्रयोगशाळांशी संधान बांधून तेथून रुग्णांच्या चाचणी अहवालाची माहिती मिळवली जाते आणि लक्षणे नसलेल्या करोना रुग्णांना रुग्णालयात दाखल केले जाते. ज्यांच्याकडे पैसे अथवा आरोग्य विमा आहे अशी लक्षणे नसलेले लोक भीतीपोटी खासगी रुग्णालयांतील करोना रुग्णांच्या खाटा अडवून बसल्याचे आम्ही केलेल्या तपासात आढळून आल्याचे पालिका आयुक्त चहेल यांनी सांगितले. यामुळे तीन दिवसांपूर्वी सर्व प्रमुख खासगी रुग्णालयांच्या प्रमुखांची बैठक घेऊन यापुढे लक्षणे नसलेल्या रुग्णांना दाखल केल्यास कारवाई केली जाईल असे त्यांनी स्पष्ट केले. खासगी रुग्णालयांनी अपवादात्मक बाब वगळता एकही करोना रुग्ण परस्पर दाखल करू नये असेही संबंधितांना सांगण्यात आले आहे.

अशी आहे पालिकेची योजना

पालिकेच्या योजनेनुसार, खासगी प्रयोगशाळांना यापुढे रुग्णाचे करोना चाचणी अहवाल थेट पालिकेला देणे बंधनकारक केले. हे अहवाल पालिकेला सकाळी सहापर्यंत मिळाल्यानंतर प्रत्येक विभागातील नियंत्रण कक्षांतील डॉक्टर रुग्णाशी संपर्क साधून त्याला कोणत्या रुग्णालयात दाखल करायचे त्याची व्यवस्था करतील. प्रत्येक प्रभागात यासाठी १० डॉक्टरांचे पथक व आवश्यक कर्मचारी तैनात ठेवण्यात आले आहेत. १० रुग्णवाहिकाही देण्यात आलेल्या आहेत. लक्षणे नसलेल्या मात्र करोना चाचणी होकारार्थी आलेल्या रुग्णांची व्यवस्था घरी किंवा पालिकेच्या वलगीककरण केंद्रात केली जाते, तर ताप किंवा अन्य लक्षणे असलेल्या रुग्णांना त्यांच्यासाठी असलेल्या रुग्णालयात उशिरात उशिरा दुपारी बारापर्यंत दाखल केले जाणार आहे. ज्यांना स्थानिक रुग्णालयात दाखल व्हायचे आहे अशांसाठी प्रभागस्तरावर नर्सिग होममधील १०० खाटा ताब्यात घेण्याचे आदेश विभाग अधिकाऱ्यांना दिले आहेत, असे पालिका आयुक्तांनी सांगितले.