ओव्हल. अगदी नावाप्रमाणेच लंबगोलाकृती असे मैदान. १९ व्या शतकाच्या स्मृती जपणाऱ्या या मैदानाने अनेक दिग्गज खेळाडूंच्या खेळी पाहिल्या आहेत. या मैदानाला जागतिक वारशाचा दर्जा प्राप्त होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.  यानिमित्ताने ‘ओव्हल मैदाना’चा इतिहास आणि त्याचे महत्त्व यासंबंधी प्रसिद्ध पुरातन वास्तुरचनेच्या अभ्यासक आभा नरेन लांबा यांच्याशी ‘लोकसत्ता’ने केलेली ही खास बातचीत.

आभा लांबा,  वास्तुरचना अभ्यासक

* ओव्हल मैदानाला युनेस्कोचा दर्जा मिळावा असे का वाटले?

जगाचा विचार करता मुंबई हे जगातील एकमेव असे शहर आहे जेथे १९ व्या शतकातील इमारती आहेत. यांना ‘व्हिक्टोरियन निओगॉथिक’ वास्तू म्हणतात. त्यांची संख्या येथे जास्त आहे. या एकाच जागी आढळत असून त्यात राजाबाई टॉवर, मुंबई उच्च न्यायालयाची इमारत, दीक्षान्त सभागृह, जुने सचिवालय यांचा समावेश आहे. या इमारतींच्या समोर २०व्या शतकाच्या सुरुवातीस उभारण्यात आलेल्या ‘आर्ट डेको’ इमारती म्हणजे आताचे बॅक-बे रेक्लमेशन, मरिन ड्राइव्ह येथे उभ्या असलेल्या इमारती. १९३० ते १९५०च्या काळात अशा इमारती उभारण्यात आल्या होत्या. मेट्रो सिनेमाची इमारत ‘आर्ट डेको’ इमारतींचे उत्तम उदाहरण ठरेल, कारण १९व्या शतकाच्या उत्तरार्धात व २०व्या शतकाच्या पूर्वार्धात देशात आधुनिकीकरणाला सुरुवात झाली होती. ही सुरुवात मुंबईतच झाली. मुंबई शहर त्या काळी खऱ्या अर्थाने ‘गेट वे ऑफ इंडिया’ होते. त्यामुळे या १९व्या व २०व्या शतकांत बांधण्यात आलेल्या इमारती या जगातील वास्तुशास्त्राचा उत्तम नमुना म्हणून ओळखल्या जातात आणि या इमारतींच्या मधोमध आजचे ‘ओव्हल मैदान’ आहे. हे मैदानही तितकेच जुने आहे. अशी रचना जगात अन्य कोणत्याही शहरात नाही. केवळ मुंबईतच दोन शतकांचा ठेवा जपणाऱ्या सौंदर्यामध्ये ओव्हल मैदान आहे. त्यामुळे ओव्हल मैदानाला युनेस्कोचा जागतिक वारशाचा दर्जा प्राप्त होणे आवश्यक आहे. मुंबईत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल स्थानकाची इमारत, एलिफंटा गुंफा यांना जागतिक वारशाचा दर्जा असून ओव्हल मैदानालाही हा दर्जा प्राप्त झाल्यास मुंबई देशातील प्रथम श्रेणीचे शहर होईल. सध्या दिल्लीमध्ये कुतुबमिनार, हुमायुनची समाधी, लाल किल्ला आदींना जागतिक वारशाचा दर्जा प्राप्त आहे.

* मैदानाची निर्मिती नेमकी कशी झाली?

मुंबईच्या दक्षिण भागात पूर्वी किल्ला होता आणि या किल्ल्यामागील जागा म्हणजे आजचे हे मैदान होते. १८६२ ते १८६४ दरम्यान मुंबईत मोठय़ा प्रमाणात प्लेगची साथ आली होती. या किल्ल्याच्या तटबंदीच्या आत अनेक छोटय़ा गल्ल्या होत्या. तसेच तेथील परिसर अस्वच्छ होता. त्यामुळे तेव्हा मुंबईचे तत्कालीन गव्हर्नर बार्टल फ्रेअर यांनी मोकळ्या वातावरणासाठी ही तटबंदी पाडून टाकण्याचा निर्णय घेतला. तटबंदीच्या जागेत भराव टाकण्यात आला आणि त्यानंतर उरलेल्या मोकळ्या भागात आजचे ‘ओव्हल मैदान’ अस्तित्वात आले. ब्रिटिश काळापासून आजपर्यंत अनेक दिग्गज क्रिकेटपटूंनी येथे आपली उत्तम खेळी केलेली आहे.

* जागतिक वारसा मिळण्याची पुढील प्रक्रिया नेमकी काय व सरकारने यासाठी काय प्रयत्न केले?

महाराष्ट्र सरकारने याबाबत चांगला पुढाकार घेतला असून दोन वर्षांपूर्वी आमची मुख्यमंत्र्यांशी याबाबत चर्चा झाली होती. महाराष्ट्र सरकारने हा प्रस्ताव केंद्र शासनाकडे सादर केला असून केंद्राने हा प्रस्ताव युनेस्कोकडे पुढील कार्यवाहीसाठी पाठवला आहे. या वर्षांच्या अखेरीस ऑक्टोबरमध्ये युनेस्कोकडून एक समिती मुंबईत येईल आणि ती मैदान व आजूबाजूच्या परिसराची पाहणी करेल. त्यानंतर जून महिन्यात जागतिक वारसा समितीची बैठक होईल. त्या बैठकीत या प्रस्तावावर चर्चा करून त्यावर पुढील निर्णय घेण्यात येईल. तसेच दिल्लीकडे हा प्रस्ताव जाण्यापूर्वी मुंबई महानगरपालिकेच्या ‘हेरिटेज कन्झव्‍‌र्हेशन कमिटी’नेही ओव्हल मैदानाला वारसास्थळ म्हणून मान्यता दिली होती. हा प्रस्ताव करण्यासाठी अनेकांची मदत झाली. ‘एमएमआरडीए’च्या ‘हेरिटेज कन्झव्‍‌र्हेशन सोसायटी’ने यासाठी १५ लाखांचा निधी दिला. तसेच चर्चगेट रेसिडेंट असोसिएशनपासून माझ्यासारख्या अनेकांनी यात आपापल्या परीने योगदान दिले.

* मुंबईतील अनेक वारसास्थळे आज दुर्लक्षित आहेत..

मुंबईत अनेक जुन्या वारसास्थळांकडे दुर्लक्ष होत आहे हे खरे असले तरी त्यांच्यासाठी काही केले जात नाही हे म्हणणे चुकीचे ठरेल. बरीच कामे होत आहेत, तर बऱ्याच ठिकाणी लक्ष देण्याची आवश्यकता आहे. खासगी मालमत्ता असलेल्या वारसास्थळांचे प्रश्नही वेगळे आहेत, मात्र सरकारी जागेत असलेल्या जुन्या वारसास्थळांचा विकास करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने एक वेगळा निधीदेखील दिला आहे. भाडे नियंत्रण कायद्यामुळे अनेक खासगी जागांच्या विकासात अडचणी आहेत.

* सांस्कृतिकदृष्टय़ा व पर्यटनाच्या दृष्टीने मुंबईवर याचा काय परिणाम होईल?

जगातील लंडन व पॅरिस तसेच अशा अन्य महत्त्वाच्या आंतरराष्ट्रीय शहरांचा विचार केला, तर या शहरांनी आधुनिक होताना शहरात असलेली आपली जुनी सांस्कृतिक ओळख जपून ठेवली आहे. मुंबईत मात्र संस्कृतीला वगैरे बाजूला सारलेले जाताना दिसते. संस्कृती जर जपली तरच पर्यटनाच्या दृष्टीने विकास होऊ शकतो. अन्य आंतरराष्ट्रीय शहरांकडून ही गोष्ट शिकून घ्यावी अशी आहे. मुंबईतही असे प्रयत्न होण्याची आवश्यकता आहे. तसे झाल्यास शहराची पर्यटनाच्या दृष्टीने आणखी वेगळी ओळख निर्माण होईल.

– मुलाखत : संकेत सबनीस