News Flash

मुंबई विद्यापीठाचा कारभार ‘प्रभारीं’कडे

परीक्षा संचालक वसावे यांच्या जागी घाटुळे यांची नियुक्ती

मुंबई विद्यापीठ

परीक्षा संचालक वसावे यांच्या जागी घाटुळे यांची नियुक्ती

ऑनलाइन मूल्यांकनाच्या आततायी निर्णयामुळे कला, वाणिज्य, व्यवस्थापनशास्त्र, विधि आदी महत्त्वाच्या शाखांमधील तब्बल १७० हून विषयांचे निकाल प्रलंबित असताना मुंबई विद्यापीठाच्या ‘परीक्षा व मूल्यमापन मंडळा’च्या संचालक पदावरून दीपक वसावे यांना हटवून त्यांच्या जागी नाशिकच्या ‘यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठा’चे परीक्षा नियंत्रक अर्जुन घाटुळे यांची प्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे कुलसचिव वगळता मुंबई विद्यापीठाचा एकूणच कारभार पुढील काही महिने बाहेरील शिक्षणसंस्थांमधील ‘प्रभारी’ अधिकाऱ्यांकडून हाकला जाणार आहे.

कुलगुरू संजय देशमुख यांना रजेवर जाण्याचे आदेश राजभवनवरून मिळाल्यानंतर त्यांच्या जागी लागोलग शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू देवानंद शिंदे यांची प्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात आली. त्याच वेळी विद्यापीठाच्या आतापर्यंत रिक्त असलेल्या प्र-कुलगुरू पदाचा कार्यभार तात्पुरत्या काळासाठी व्हीजेटीआयचे संचालक धीरेन पटेल यांच्याकडे सोपविण्यात आला.

दरम्यान वसावे यांनीही आपल्याकडील परीक्षा मंडळाच्या संचालक पदाचा अतिरिक्त कार्यभार काढून घेण्याची विनंती केली होती. उप कुलसचिवपदी कार्यरत असलेल्या वसावे यांच्याकडेही विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाच्या संचालकपदाचा अतिरिक्त कार्यभार होता. या जबाबदारीतून आपल्याला १६ ऑगस्टपर्यंत मुक्त करण्यात यावे, अशी विनंती वसावे यांनी केली होती. त्यानुसार वसावे यांना अतिरिक्त कार्यभारातून मुक्त करण्यात आले आहे. त्यांच्या जागी नियुक्त करण्यात आलेल्या अर्जुन घाटुळे यांच्याकडे तीन महिन्यांकरिता परीक्षा मंडळाच्या संचालक पदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

ऑनलाइन मूल्यांकनामुळे झालेला घोळ निस्तरण्याचे काम प्रामुख्याने घाटुळे यांना करावे लागणार आहे. अजूनही लाखभर उत्तरपत्रिकांचे मूल्यांकन प्रलंबित आहे. त्यात तांत्रिक घोळामुळे उत्तरपत्रिकांचे मूल्यांकन होऊनही प्रत्यक्ष निकाल तयार करून तो जाहीर करण्यास विलंब होत आहे. हा गोंधळ निस्तरण्याचे आव्हान घाटुळे यांच्यासमोर असेल. घाटुळे यांनी बुधवारीच आपल्या नवीन पदाची जबाबदारी स्वीकारली.

प्रभारी कुलगुरू देवानंद शिंदे यांच्याशी चर्चा करून त्यांनी परीक्षा विभागाचे काम समजून घेतले. गुरुवारी प्रत्यक्ष परीक्षा विभागाला भेट देऊन आपण परिस्थितीचा आढावा घेऊ आणि त्यानंतर कामाला सुरुवात करू, असे घाटुळे यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना सांगितले.

बाहेरच्या अधिकाऱ्यांकडे कारभार

विद्यापीठाचे कुलसचिव एम. ए. खान यांची हाज समितीच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी नियुक्ती झाल्याने तेही आपल्या पदाचा कार्यभार लवकरात लवकर सोडू इच्छितात; परंतु सध्या विद्यापीठात सुरू असलेल्या ‘निकाल आणीबाणी’मुळे प्रशासकीय यंत्रणा ढासळू नये म्हणून त्यांना अद्याप त्यांच्या जबाबदारीतून मुक्त करण्यात आलेले नाही. त्यामुळेच कुलसचिव वगळता सध्या कुलगुरू, प्र-कुलगुरूंपाठोपाठ परीक्षा संचालक पदावरही अन्य शिक्षण संस्थेतील अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आल्याने विद्यापीठाचा एकूणच कारभार सध्या बाह्य़ अधिकाऱ्यांच्या हाती गेला आहे.

ऑनलाइन मूल्यांकनाच्या कामाचा अनुभव गाठीशी आहे.  माझ्या नेतृत्वाखाली मुक्त विद्यापीठात आतापर्यंत तीन परीक्षांचे ऑनलाइन मूल्यांकन झाले आहे. मुक्त विद्यापीठात दर वर्षी जवळपास सात लाख विद्यार्थ्यांच्या सुमारे ४१ लाख उत्तरपत्रिका ऑनलाइन तपासल्या जातात. या अनुभवाचा आपल्याला निश्चितपणे फायदा होईल.   –अर्जुन घाटुळे,  प्रभारी परीक्षा संचालक, मुंबई विद्यापीठ

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 17, 2017 1:52 am

Web Title: arjun ghatule in mumbai university
Next Stories
1 झोपु सुधार मंडळात घोटाळा सुरूच!
2 फक्त १७ गणेश मंडळांना मंडप उभारणीस परवानगी
3 राज्यात कुठेही शांतता क्षेत्र नाही!
Just Now!
X