पुण्यातील खडकी येथील सैनिकी तळावरील वरिष्ठ अधिकाऱ्यांची नावे चिठ्ठीत लिहून एका जवानाने मुंबईतल्या गावदेवी परिसरात आत्महत्या केली. निरज यादव(२५) असे जवानाचे नाव असून तो मूळचा राजस्थानचा रहिवासी आहे.

गावदेवी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार १८ जूनला तो खडकी तळावरून कोणाला काहीही न सांगता बाहेर पडला. २३ जूनला निरज येथील स्वामी नारायण सेवा आश्रमात वास्तव्याला आला. सकाळी आश्रमातून बाहेर पडल्यानंतर रात्री निवासासाठी तो पुन्हा आश्रमातच येत असे. सोमवारी सकाळी आश्रमातील सफाई कामगाराला निरजचा मृतदेह त्याच्या खोलीत पंख्याला लटकलेल्या अवस्थेत आढळला.

या घटनेची माहिती तातडीने पोलिसांना देण्यात आली. गावदेवी पोलिसांनी निरजचा मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठविला. तपासात पोलिसांना निरजची चिठ्ठी सापडली. त्यात काही लष्करी अधिकाऱ्यांची नावे नमूद असून त्यांच्यापासून होत असलेल्या छळाबाबत लिहिले असल्याचे समजते.

गावदेवी पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद करत पुढील चौकशी व तपास सुरू केल्याची माहिती पोलीस प्रवक्त्या डॉ. रश्मी करंदीकर यांनी दिली. मात्र अधिक तपशील देण्यास नकार दिला. याबाबत अधिक माहिती घेण्यासाठी गावदेवी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक नेताजी भोपळे, परिमंडळ २ चे उपायुक्त ज्ञानेश्वर चव्हाण यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनीही अधिक माहिती देण्यास नकार दिला. शवविच्छेदन अहवालानंतरच या प्रकाराचा उलगडा होण्याची शक्यता असल्याचे एका पोलिसाने यावेळी सांगितले.