धोकादायक ‘एस्प्लनेड मेन्शन’मधील उपाहारगृहाचे परवानगीविना नूतनीकरण

काळाघोडा परिसरातील महात्मा गांधी मार्गावरील धोकादायक अवस्थेत उभ्या असलेल्या ‘एस्प्लनेड मेन्शन’च्या तळमजल्यावरील ‘आर्मी रेस्टॉरन्ट’वर २४ तासांची नोटीस बजावल्यानंतर शुक्रवारी पालिकेने हे उपाहारगृह बंद केले. धोकादायक इमारतीमधील या उपाहारगृहाला टाळे ठोकण्यात येईल, असा इशारा पालिकेने शुक्रवारी मालकाला दिला. त्यानंतर मालकाने शुक्रवारी उपाहारगृह बंद केले.

काळाघोडा परिसरातील महात्मा गांधी मार्गावर मुंबई विद्यापीठाच्या समोर सत्र न्यायालयाला लागून ‘एस्प्लनेड मेन्शन’ ही इमारत आहे. इमारतीच्या तळमजल्यावरील ‘आर्मी रेस्टॉरन्ट’चे नुकतेच नूतनीकरण करण्यात आले आणि त्या जागी ‘सबालन द टेस्ट ऑफ पर्शिया’ हे नवीन इराणी हॉटेल सुरू झाले. ही इमारत अत्यंत धोकादायक बनली आहे. तसेच ती पुरातन वास्तूअंतर्गत येत असल्यामुळे नूतनीकरणाच्या कामाला पालिकेच्या पुरातन वास्तू समितीने परवानगी दिली होती का, असाही प्रश्न  निर्माण झाला होता. त्यामुळे ‘फेडरेशन ऑफ रेसिडण्टस ट्रस्ट’ या संस्थने या नूतनीकरणाला पालिकेची परवानगी दिली होती का याची माहिती मागवली होती. मात्र या नूतनीकरणाला कोणतीही परवानगी नसल्याचे पुढे आले आहे. उपाहारगृहाच्या नूतनीकरणास येथील ‘उद्री’, ‘ओव्हल ट्रस्ट’, ‘एनसीपीए’ आणि ‘काळा घोडा असोसिएशन्स’ या संस्थांनी आक्षेप घेतला होता. त्या पाश्र्वभूमीवर ‘ए’ विभाग कार्यालयाने या उपाहारगृहाला नोटीस बजावली होती.

एस्प्लनेड मेन्शन ‘म्हाडा’ची उपकरप्राप्त इमारत असून २००७ मध्येच धोकादायक ठरवण्यात आली होती. ‘म्हाडा’ने या इमारतीतील रहिवाशांना घरे रिकामी करण्याची नोटीस बजावली होती. मात्र अशोक सराओगी यांनी उच्च न्यायालयात धाव घेतल्यामुळे न्यायालयाने या इमारतीतील रहिवाशांना आपापल्या जबाबदारीवर राहण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार या इमारतीत काही रहिवासी राहात आहेत. पालिकेच्या ‘ए’ विभागाने या इमारतीत उपाहारगृह चालवण्यास परवानगी दिली होती. डिसेंबर २०१९ पर्यंतचा हा परवाना होता, असेही या नोटीसमध्ये म्हटले आहे.

उपाहारगृहाला परवानगी दिलेली असली तरी हा परवाना कुठल्याही क्षणी मागे घेण्याची तरतूद पालिकेच्या कायद्यात असून त्याआधारे ही नोटीस बजावण्यात आली असल्याचे या नोटिशीमध्ये म्हटले आहे. एखाद्या उपाहारगृहाची वास्तू धोकादायक असेल किंवा त्यामुळे लोकांच्या आरोग्याला धोका निर्माण होण्याची शक्यता असेल तर हा परवाना मागे घेता येईल अशी तरतूद असल्यामुळे ए विभाग कार्यालयाने हे उपाहारगृह ताबडतोब बंद करण्याचे आदेश उपाहारगृहाचे मालक महमूद गोलाफताब यांच्या नावाने पाठवलेल्या नोटिशीत दिले आहेत. या इमारतीत रहिवाशांना आपापल्या जबाबदारीवर राहण्याची परवानगी उच्च न्यायालयाने दिलेली असली तरी या उपाहारगृहातील कर्मचारी आणि ग्राहक यांचा जीव धोक्यात घालता येणार नाही, असेही या नोटिशीत बजावण्यात आले आहे. तसेच हे उपाहारगृह बंद करण्यासाठी २४ तासांचा अवधी देण्यात आला आहे. नोटीसची मुदत संपुष्टात येताच शुक्रवारी पालिका अधिकारी या उपाहारगृहात दाखल झाले. त्या वेळी उपाहारगृह सुरू होते. उपाहारगृह बंद न केल्यास टाळे (सील) ठोकण्यात येईल, असा इशारा पालिका अधिकाऱ्यांनी दिला. त्यामुळे उपाहारगृह मालकाने स्वत:च ‘आर्मी रेस्टॉरन्ट’ बंद केले. दरम्यान, ‘आमी रेस्टॉरन्ट’चे मालक महमूद गोलाफताब यांच्याशी मोबाइलवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. तसेच त्यांचा लघुसंदेशही पाठविण्यात आला. मात्र त्यांच्याकडून कोणतीही प्रतिक्रिया मिळू शकली नाही