सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरण

अभिनेता सुशांतसिंह राजपूत मृत्यूप्रकरणी रिपब्लिक वाहिनीचे मुख्य संपादक अर्णब गोस्वामी यांनी वृत्तवाहिनीच्या माध्यमातून आपली आणि मुंबई पोलिसांची जाणीवपूर्वक बदनामी केली, असा आरोप करत पोलीस उपायुक्त अभिषेक त्रिमुखे यांनी गोस्वामी यांच्याविरोधात बुधवारी सत्र न्यायालयात फौजदारी तक्रार दाखल केली.

राज्याच्या गृह विभागाकडून रीतसर मंजुरी घेतल्यानंतर त्रिमुखे यांनी गोस्वामी यांच्यासह त्यांची पत्नी सम्यब्रता आणि रिपब्लिक वाहिनीची मालकी असलेल्या एआरजी आऊटलीयर मीडियाविरोधात ही फौजदारी तक्रार दाखल केली आहे.

सुशांत मृत्यू प्रकरणाच्या सुरुवातीच्या तपासाच्या वेळी गोस्वामी आणि रिपब्लिक वाहिनीने आपल्या आणि मुंबई पोलिसांविरोधात बदनामीकारक वृत्ते प्रसिद्ध केली. सुशांतच्या मारेकऱ्यांना मुंबई पोलिसांकडून वाचवण्याचा प्रयत्न केला जात आहे, सुशांतच्या मृत्यूच्या एक महिना आधीपासून त्रिमुखे हे अभिनेत्री रिया चक्रवर्तीच्या सतत संपर्कात होते, असे वृत्त गोस्वामी हे रिपब्लिक वाहिनीवरून सतत प्रसिद्ध करत होते. दुष्ट हेतूने हे वृत्त प्रसिद्ध केले जात होते, असा आरोपही त्रिमुखे यांनी तक्रारीत केला आहे. आपली व मुंबई पोलिसांची बदनामी करणारे वृत्त प्रसिद्ध करण्यास गोस्वामी यांना मज्जाव करावा. तसेच आतापर्यंत करण्यात आलेल्या बदनामीच्या आर्थिक नुकसानभरपाईसह कायदेशीर लढाईसाठी येणाऱ्या खर्चाची भरपाई देण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणीही त्रिमुखे यांनी केली आहे.

नुकसानभरपाई देण्याची मागणी

गोस्वामी यांनी वाहिनीच्या माध्यमातून मुंबई पोलिसांवर हेतुत: हल्ला चढवला. सुशांतच्या मारेकऱ्यांना वाचवण्यासाठी आपण आपल्या पदाचा दुरुपयोग केल्याचे वृत्त आपले नाव आणि छायाचित्रासह प्रसिद्ध केले गेले. शिवाय रियाला वाचवण्यासाठीच मुंबई पोलिसांनी तपासाची महत्त्वाची माहिती उघड केली. सुशांतच्या मृत्यूपूर्वी आपण रियाच्या संपर्कात होतो, असे वृत्त दाखवून गोस्वामी आणि रिपब्लिक वाहिनीने आपल्या प्रतिष्ठेला धक्का पोहोचवला आहे. ही भरपाई भरून काढण्यासाठी खूप वेळ लागणार आहे. त्यामुळे गोस्वामी यांना नुकसानभरपाई देण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी त्रिमुखे यांनी केली आहे. गोस्वामी यांच्या वादग्रस्त असे वर्तन तसेच त्यांच्या नैतिक मूल्यांचा अभाव असलेल्या पत्रकारितेमुळे नंतर ते स्वत: वादात अडकले आणि त्यांच्याविरोधात अनेक गुन्हे दाखल झाले. त्यांच्या या कृतीला कायद्याने जरब बसवण्याची आवश्यकता आहे, असेही त्रिमुखे म्हणाले.