21 February 2019

News Flash

आरोग्य सेविकाच प्रसूती रजेपासून वंचित

वस्तीतल्या घराघरांमध्ये स्तनपान करण्याचं महत्त्व समजावून सांगत असतो.

( संग्रहीत प्रतिकात्मक छायाचित्र )

स्तनपानाचा हक्क मिळविण्यासाठी आंदोलन

वर्षांताईंची प्रसूती होऊन जेमतेम एक महिना झाला असेल. सिझेरियन झाल्याने अजून चालतानाही त्रास होतो. पण आरोग्य केंद्राच्या डॉक्टरांनी रजा देणार नाही सांगितलं. बिनपगारी रजा परवडणारी नाही म्हणून त्या कामावर रूजू झाल्या. दिवसभर पाच तास बाहेर असल्याने बाळाचं पोट भरण्यासाठी नाईलाजाने त्याला बाहेरचं दूध सुरू करावं लागलं. ‘वस्तीतल्या घराघरांमध्ये स्तनपान करण्याचं महत्त्व समजावून सांगत असतो. परंतु स्वत:च्याच बाळाला निव्वळ स्तनपान देता येत नाही हे जीवाला खात राहतं,’ हे लताताईंच वाक्य खूप काही सांगून जातं..

मुंबईतील झोपडपट्टी, वस्त्यांमधील घराघरांमध्ये जाऊन गरोदर मातांना आरोग्याचे महत्त्व पटवून देणाऱ्या, बालकांची काळजी कशी घ्याल हे समजावून सांगणाऱ्या या आरोग्य सेविका १९८८ सालापासून पालिकेच्या आरोग्य केंद्रावर मानधन तत्त्वावर आरोग्य सेविका म्हणून कार्यरत आहेत. मात्र प्रसूती रजा लागू नसल्याने या शेवटच्या दिवसापर्यत कामावर हजर राहावे लागते. प्रसूतीनंतर दोन महिने रजा घेण्याची मुदत असली तरी मानधन दिले जात नाही. आर्थिक परिस्थिती बिकट असलेल्या अनेक महिला महिनाभराच्या बाळाला सोडून कामावर रूजू होतात. दोन महिन्यानंतर कामावर रुजू न झाल्यास काढून टाकले जात असल्याने महिला मूल आणि काम अशी दुहेरी जबाबदारी पेलण्यासाठी धडपड करत आहेत. म्हणूनच भरपगारी प्रसूती रजा आणि स्तनपानाचा हक्क मिळविण्यासाठी शुक्रवारपासून आरोग्य सेविकांना रस्त्यावर उतरावे लागले.

कांदिवलीच्या आरोग्य केंद्रावर काम करत असून सध्या सहावा महिना सुरू आहे. चेंबूरला राहत असल्याने प्रसुतीनंतर एकाच महिन्यात बाळाला सोडून कसे रूजू व्हायचे, याचाच सध्या विचार करत आहे. काहीच मार्ग न निघाल्यास नाईलाजाने बिनपगारी तीन महिन्याची रजा जरी घेतली तरी चौथ्या महिन्यापासून बाळाच्या दूधाची सोय कशी करणार, हेच समजत नाही, असे अश्विनी ताई व्यक्त करतात.

प्रसुतीच्या शेवटच्या दिवसापर्यत काम करणाऱ्या सुनिताताई सांगतात, ‘२८ जानेवारीला पोलिओचा कार्यक्रम पूर्ण केला आणि त्याच रात्री माझी प्रसूती झाली. शेवटच्या दिवसापर्यत घराघरामध्ये नोंदी घेण्याचे काम सुरूच होते. तीन महिन्याची रजा घेऊन चौथ्या महिन्यापासून कामावर रुजू झाले. माझ्याच भागामध्ये काम करत असल्याने तासादोनतासाच्या अंतराने जिथे कुठे असेल त्या घरापासून धावत घरी येते बाळाला पाजून पुन्हा कामाला जाते.’ बाळाच्या संगोपनासाठी खासगी आणि शासकीय कर्मचाऱ्यांना भरपगारी सहा महिन्यापर्यतची रजा मंजूर करण्यात आली आहे. गेली २३ वर्षे मुंबईच्या झोपडपट्टीमधील प्रत्येक घरातील गरोदर माता आणि बालकांची काळजी आम्ही घेतो. मग आमच्यातील गरोदर माता आणि बालकांच्या काळजीसाठी पालिका कधी पुढाकार घेणार, असा प्रश्न आरोग्य सेविकांनी उपस्थित केला आहे.

‘दुग्धहरण’ थांबवण्याची गरज!

स्तनपान हा मानवी जीवनाचा पाया आहे हे घोषवाक्य घेऊन वर्ल्ड अलायन्स फॉर ब्रेस्टफीडिंग (वाबा) आणि जागतिक आरोग्य संघटना यंदाचा स्तनपान आठवडा एक ते सात ऑगस्ट दरम्यान साजरा करत आहे. मात्र आपल्याकडे कष्टकरी समाजापासून ते आरोग्य क्षेत्रापर्यत कार्यरत असलेल्या परंतु कर्मचारीचा शिक्का न बसलेल्या अनेक महिलांना आर्थिकदृष्टय़ा परवडत नसल्याने इच्छा असूनही पहिल्.ा सहा महिन्यांमध्ये पूर्णवेळ स्तनपान करता येत नाही. तेव्हा हे दुग्धहरण थांबविण्यासाठी उपाययोजना होणे गरजेचे असल्याचे बीपीएनआयचे (ब्रेस्टफिडींग प्रमोश नेटवर्क ऑफ इंडिया) डॉ. प्रशांत गांगल यांनी सांगितले.

First Published on August 4, 2018 2:13 am

Web Title: arogya sevika movement for breastfeeding rights