‘मरे’च्या प्रवाशांत ६ वर्षांत २ लाखांची भर; मात्र दैनंदिन फेऱ्यांमध्ये अवघ्या ८७ ने वाढ

मध्य रेल्वेवरील प्रवाशांच्या संख्येत गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा थोडी घट झाली असली, तरी पाच वर्षांपूर्वीच्या प्रवासी संख्येशी तुलना केली असता ही संख्या प्रचंड वाढली आहे. सहा वर्षांपूर्वी दर दिवशी ३८ लाख असलेली मध्य रेल्वेची प्रवासी संख्या आता ४०.२५ लाखांच्याही पुढे गेली आहे. पण या सहा वर्षांमध्ये मध्य रेल्वेच्या फेऱ्यांच्या संख्येत केवळ ८७ फेऱ्यांची भर पडली आहे. त्यामुळे आभाळाएवढय़ा प्रवासी संख्येला तुटपुंज्या फेऱ्यांची ठिगळे लावता लावता मध्य रेल्वे प्रशासनाच्या नाकी नऊ आले आहेत.

गेल्या सहा वर्षांमध्ये मध्य रेल्वेवर ठाणे-कुर्ला पाचवी-सहावी मार्गिका, हार्बर मार्गावर १२ डब्यांच्या गाडय़ा आणि डीसी-एसी परिवर्तन वगळता इतर कोणताही मोठा प्रकल्प पूर्ण झालेला नाही. डीसी-एसी परिवर्तनामुळे मध्य रेल्वेच्या फेऱ्यांचा वेग वाढला असून त्यानंतर मध्य रेल्वेच्या मुख्य तसेच हार्बर मार्गावर काही फेऱ्या वाढवण्यात आल्या. या फेऱ्या प्रामुख्याने कमी गर्दीच्या वेळेतच वाढल्याने त्याचा थेट फायदा प्रवाशांना फारच कमी मिळतो. पण ट्रान्स हार्बर मार्गावर वाढलेल्या फेऱ्यांमुळे या मार्गावरील प्रवाशांना दिलासा मिळाला आहे.

कोणतीही प्रणाली यशस्वीपणे आणि वक्तशीरपणे चालवण्यासाठी त्या प्रणालीच्या एकूण क्षमतेपैकी ८० टक्के क्षमताच वापरणे आवश्यक असते. त्यामुळे प्रणालीत बिघाड झाल्यास उर्वरित २० टक्के क्षमतेचा वापर करून वक्तशीरपणा सांभाळणे शक्य होते. पण मध्य रेल्वेवर सध्या १०० टक्के क्षमतेने एकूण १६६० फेऱ्या चालवल्या जात आहेत. २०११मध्ये या फेऱ्यांची संख्या १५७३ एवढी होती. तर सध्या मध्य रेल्वेवरील दर दिवशीच्या प्रवाशांची संख्या सरासरी ४०.३५ लाख एवढी आहे. ही संख्या २०११मध्ये ३८.३५ लाख एवढी होती. या वाढलेल्या दोन लाखांपेक्षा जास्त प्रवाशांना सामावण्यासाठी मध्य रेल्वेवर फक्त ८७ सेवा वाढवण्यात आल्या.

mv06

या फेऱ्यांपैकी सर्वाधिक वाढ मुख्य मार्गावर झाली आहे. मुख्य मार्गावर २०१०-११ वर्षांपासून ५३ फेऱ्या वाढवण्यात आल्या. हार्बर मार्गावरील वाढलेल्या फेऱ्यांची संख्या १० एवढी असून ट्रान्स हार्बर मार्गावर २४ फेऱ्या वाढवण्यात आल्या आहेत.

मुख्य मार्गावर वाढलेल्या ५३ फेऱ्या प्रामुख्याने ठाण्यापासून बदलापूर, आसनगाव, टिटवाळा आदी स्थानकांसाठी शटल सेवा म्हणून सुरू झाल्या आहेत. काही सेवा कुर्ला-कल्याण यांदरम्यान वाढवल्या आहेत. तर हार्बर मार्गावर फक्त १० फेऱ्या वाढल्या असल्या, तरी सर्वच्या सर्व ५९० फेऱ्या नऊ ऐवजी १२ डब्यांच्या करण्यात आल्या आहेत. त्यामुळे या मार्गावर प्रवासी वहन क्षमता वाढल्याचे मध्य रेल्वेच्या जनसंपर्क विभागातर्फे सांगण्यात आले.