एकूण आकडा ८६ वर; नऊ जणांचा मृत्यू

मुंबई : धारावीसाठी कृती आराखडा आणि सूक्ष्म नियोजन करूनही रहिवाशांचा बेशिस्त वावर सुरूच असल्याने धारावीतील रुग्णांचा आकडा दर दिवशी वाढतो आहे. अत्यंत दाटीवाटीची वस्ती असलेल्या या भागात गुरुवारी नवीन २६ नवीन रुग्ण आढळले असून रुग्णांचा एकूण आकडा ८६ वर गेला आहे. आतापर्यंत या भागात ९ जणांचा बळी गेला आहे.

मुंबईत करोनाचा संसर्ग वाढल्यास धारावीसारख्या दाटीवाटीच्या झोपडपट्टीत त्याचा उद्रेक होईल, अशी भीती व्यक्त होत असते. तसेच येथील लोकवस्ती पाहता तो आवरणे यंत्रणांना कठीण जाणार आहे. त्यामुळे सगळ्या सरकारी यंत्रणेचे लक्ष धारावीकडे लागले आहे. धारावीसाठी विशेष कृती आराखडाही तयार करण्यात आला असून प्रत्येक नागरिकांची तपासणी केली जात आहे. तपासणी कठोर के ल्याने दर दिवशी इथे रुग्णांचा आकडा वाढतच आहे. गुरुवारी २६ नवीन रुग्ण सापडल्यामुळे धोका काहीसा वाढला आहे.

याआधीच प्रतिबंधित केलेल्या भागाबरोबरच इतर वस्त्यांमध्येही नव्याने रुग्ण सापडू लागले आहेत. गुरुवारी सापडलेल्या २६ रुग्णांमध्ये २० पुरुष आहेत. मुस्लिम नगर भागातच ११ रुग्ण आढळले असून आधीच प्रतिबंधित असलेल्या मुकुंद नगर मध्ये ४ जण सापडले आहेत. साईराज नगर, रामजी चाळ, सोशल नगर इथेही रुग्ण सापडले आहेत.

पालिकेच्या जी उत्तर विभागाने धारावीसाठी स्वतंत्र कृती आराखडा तयार केला आहे. धारावी परिसरात एकही रुग्ण आढळला की त्याच्या संपर्कातील लोकांचे विलगीकरण केले जाते. धारावीत संसर्ग वाढू नये म्हणून राजीव गांधी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स येथे तयार करण्यात आलेल्या विलगीकरण कक्षात या लोकांना ठेवले जात आहे.

तपासणी आणि चाचण्यांमुळे रुग्ण आढळले

धारावीत टप्याटप्याने मोठय़ा प्रमाणावर तपासणी आणि वैद्यकीय चाचण्या केल्या जात आहेत. त्यामुळे हे रुग्ण ठराविक भागात आढळून आले आहेत, अशी माहिती सहाय्यक आयुक्त किरण दिघावकर यांनी दिली. धारावीत १० लाख लोक राहत असून त्यांच्यापर्यंत हा संसर्ग पोहोचू नये म्हणून येत्या काळात मोठय़ा प्रमाणावर विलगीकरण कक्ष या भागात उभारावे लागणार आहेत. आतापर्यंत १००० खाटांची सोय करण्यात आली आहे. आणखी कक्ष स्थापन करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले.