करोना संक्रमणाचे गणिती प्रारूप लक्षात घेत भविष्यात संभाव्य बाधितांसाठी मुंबईमधील सरकारी, पालिका आणि खासगी रुग्णालयांमध्ये प्राणवायू सुविधेसह तब्बल ७० हजार खाटा सज्ज ठेवण्याचे आदेश पालिका आयुक्त  प्रवीणसिंह परदेशी यांनी शनिवारी एका महत्त्वाच्या बैठकीत दिले.

करोना संक्रमणाचे गणिती प्रारूप लक्षात घेत पालिका मुख्यालयात शनिवारी सर्व रुग्णालयांचे अधिष्ठाता, अधीक्षक आणि विशेष कार्यकारी अधिकारी आदी वरिष्ठ मंडळींची विशेष बैठक आयोजित करण्यात आली होती. करोनाबाधित रुग्णांसाठी रुग्णालयात उपलब्ध खाटांच्या क्षमतेचा आढावा घेण्यात आला.

भविष्यात करोनाबाधितांवर वेळीच उपचार करता यावेत यासाठी काही खासगी रुग्णालये ताब्यात घेण्याचे आदेशही प्रवीणसिंह परदेशी यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले. एमबीबीएस डॉक्टरांची अपुरी संख्या लक्षात घेऊन करोना दक्षता केंद्रासाठी डॉक्टर उपलब्ध करावे, अशी सूचना डेंटल डॉक्टर्स असोसिएशनला करण्यात यावी, तसेच ‘वन रुपी क्लिनिक’साठी डॉक्टर, परिचारिका उपलब्ध करण्याचे आवाहन सामाजिक संस्थांना करावे, असे निर्देश त्यांनी संबंधितांना दिले.

रुग्णांसाठी गोरेगाव एक्झिबिशन सेंटर येथे प्राणवायूची सुविधा असलेल्या १,२४० खाटांची व्यवस्था करण्यात येणार असून वरळी येथील एनएससीआय डोम आणि पवईच्या एमसीएमसीआय येथे प्राणवायूच्या सुविधेसह अनुक्रमे ५०० व २५० खाटांची व्यवस्था करावी, असेही आदेश त्यांनी दिले.

रुग्णवहनासाठी उबरची तयारी..

रुग्णांच्या चाचणीसाठी वा अन्य कारणांसाठी ने-आण करण्यासाठी उबर टॅक्सी सेवेने तयारी दर्शविली आहे. त्यासाठी टॅक्सीचालकाला परवानगी पत्र देण्यात येईल. एका टॅक्सीमधून एकाच रुग्णाला घेऊन जावे. त्याचा नातेवाईक असल्यास त्याला दुसऱ्या टॅक्सीतून जाऊ द्यावे. रुग्णाला टॅक्सीमधून घेऊन जाते वेळी वातानुकू लित यंत्रणा बंद ठेवावी, खिडक्या उघडय़ा ठेवाव्या, असेही आयुक्तांनी बैठकीत स्पष्ट केले. उबर टॅक्सीतून रुग्णाची ने-आण करण्याच्या नियोजनाची जबाबदारी आयुक्तांनी काही अधिकाऱ्यांवर सोपविली आहे.