माहीम येथील एका व्यावसायिकाकडून दंड माफ करण्यासाठी आठ हजार रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी बेस्टचे विभाग निरीक्षक सुहास नामजोशी व त्यांचे सहकारी तुळशीदास जगताप यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी अटक केली.

माहीम येथे राहणारा हा व्यावसायिक आपल्या निवासी जागेत व्यवसाय करत होता. त्यामुळे त्याला त्या जागेचे वीजदेयक व्यावसायिक दराने देणे आवश्यक असताना ते निवासी दरानेच देण्यात येत होते. याबाबत नामजोशी आणि चौकशी अधिकारी विवेक शिंदे यांनी या व्यावसायिकास ९० हजार रुपये दंड आकारणार असल्याचे सांगितले. हा दंड कमी करण्यासाठी १० हजारांची लाच या अधिकाऱ्यांनी मागितली असता आठ हजारांवर तडजोड झाली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी तक्रार आल्यानंतर दादर पश्चिमेस सापळा रचून पैसे घेण्यासाठी आलेल्या तुळशीदास जगताप या सहकाऱ्याला लाच स्वीकारताना अटक केली. त्यानंतर वडाळा बेस्ट आगारातून नामजोशी यालाही अटक करण्यात आली.