घाटकोपर येथील चेतना अजमेरा (५१) यांच्या हत्येप्रकरणात फरार असलेल्या आणखी एका मुख्य आरोपीला अटक करण्यात आली आहे. हेमंत मिनारिया असे या आरोपीचे नाव असून अहमदाबाद पोलिसांनी त्याला सोमवारी संध्याकाळी अटक केली.
घाटकोपरच्या वैशाली नगरमध्ये राहणाऱ्या चेतना अजमेरा यांची हत्या ७ मे २०१२ रोजी घरातील तीन नोकरांनी केली होती. चेतना अजमेरा या प्रख्यात बिल्डर जयंत अजमेरा यांच्या पत्नी होत्या. हेमंत मिनारिया याला अजमेरा यांनी ६ हजार रुपये दिले नव्हते. त्याचा राग मनात धरून त्याने इतर दोन नोकरांसह मिळून अजमेरा यांच्या हत्येचा कट रचला होता. त्यांची हत्या केल्यानंतर या तिघांनी त्यांच्या घरातील दीड कोटी रुपयांचे सोन्याचे दागिने आणि मौल्यवान वस्तू चोरल्या होत्या. या प्रकरणातली महेंद्र राठोड आणि चोरलेले महागडे घडय़ाळ विकत घेणारा शामलाल सोनी याला यापूर्वीच पोलिसांनी अटक केली होती. तेव्हापासून फरार असलेल्या अशोक पुरोहित आणि हेमंत मिनारिया या दोघांच्या शोधासाठी पोलिसांनी कंबर कसली होती.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on February 26, 2013 3:13 am