मैत्रिणीची आक्षेपार्ह छायाचित्रे ‘फेसबुक’वर टाकल्याप्रकरणी सायबर सेल पोलिसांनी शनिवारी आंतरराष्ट्रीय बॅंकेत काम करणारा उच्चशिक्षित तरुण आणि त्याच्या मित्राला अटक केली. अमित कारखानीस (३२) असे या तरुणाचे नाव असून तो मुंबईत स्टॅण्डर्ड चार्टर्ड बँकेत उच्च पदावर काम करत होता.तर त्याचा मित्र ओंकार प्रधान यालाही पोलिसांनी पुणे येथून अटक केली आहे. या मैत्रिणीने लग्नास नकार दिल्यामुळे तिच्यावर सूड उगविण्यासाठी अमित याने हे कृत्य केल्याचे पोलिसांनी सांगितले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिडीत तरुणी आणि अमित हे  एकाच ठिकाणी कामाला होते. अमितने या तरुणीची काही आक्षेपार्ह छायचित्रे अश्लिल संकेतस्थळांवरही टाकली असल्याचे तसेच या तरुणीच्या नावाने बोगस ई-मेल खाते उघडून तिच्या नावाने सहकाऱ्यांशी चॅट करत असल्याचेही पोलीस तपासात उघड झाले आहे. कारखानीस याला गुरुवापर्यंत पोलीस तर प्रधान याला येत्या १२ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.

 

तीन तृतीयपंथीयांविरोधात गुन्हा

 घरात असलेल्या अतृप्त आत्म्याची शांती करण्याच्या बहाण्याने एका गुजराथी कुटुंबाच्या घरी जाऊन सुमारे ८५ हजार रुपयांचे दागिने घेऊन पोबारा केलेल्या तीन अज्ञान तृतीयपंथीयांचा घाटकोपर पोलीस शोध घेत आहेत.

कमलेश दत्तानी यांनी या प्रकरणी पोलिसात फिर्याद दाखल केली आहे. घरात पूजा करण्याच्या बहाण्याने या तिघांनी प्रवेश केला. कमलेश याच्या वहिनीला या तिघांनी घाबरवून घरात पूजा करण्यास सांगितले. या वेळी तिला घरातील दागिने तिच्या नवऱ्याच्या कपडय़ात गुंडाळून ठेवण्यास सांगून ते गाठोडे घराच्या दर्शनी भागात ठेवण्याची सूचना केली आणि नंतर हे गाठोडे घेऊन पळ काढला.