मुंबई : शहरी नक्षलवाद आरोपप्रकरणी अटकेत असलेले ८२ वर्षांचे लेखक-कवी वरवरा राव यांच्या अंतरिम जामिनाच्या याचिके वर उच्च न्यायालय आज, सोमवारी निर्णय देणार आहे.
वैद्यकीय कारणास्तव राव यांची तातडीच्या अंतरिम जामिनावर सुटका करावी या मागणीसाठी राव यांच्यासह त्यांच्या पत्नी हेमलता यांनी स्वतंत्र याचिका केली होती. प्रदीर्घ सुनावणीनंतर न्यायमूर्ती एस. एस. शिंदे आणि न्यायमूर्ती मनीष पितळे यांच्या खंडपीठाने याचिके वरील निर्णय राखून ठेवला होता. तसेच निर्णय होईपर्यंत राव यांना नानावटी रुग्णालयातच ठेवण्याचे स्पष्ट केले होते.
दरम्यान, राव यांनी गेल्या ३६५ दिवसांपैकी १४९ दिवस विविध रुग्णालयात घालवले आहेत. त्यातूनच त्यांची वैद्यकीय स्थिती लक्षात येते, असा युक्तिवाद राव यांच्या कुटुंबियांतर्फे सुनावणीच्या वेळी करण्यात आला. त्यामुळे राव यांची वैद्यकीय स्थिती माहीत असूनही त्यांना अटकेत ठेवणे म्हणजे त्यांच्या जगण्याच्या आणि चांगल्या आरोग्याच्या मूलभूत अधिकाराचे उल्लंघन आहे, असा दावाही करण्यात आला.
राव यांची प्रकृती ही कारागृहात नाही, तर कुटुंबात राहून सुधारेल, असा दावा करत तळोजा कारागृहाऐवजी हैदराबाद येथे त्यांच्या कुटुंबियांसोबत राहण्याची परवानगी देण्यात यावी, अशी मागणी राव यांच्या कु टुंबियांतर्फे करण्यात आली.
राव यांच्यावर नक्षलवादी चळवळीला प्रोत्साहन देणे, सशस्त्र क्रांतीद्वारे सध्याचे सरकार उलथवून लावण्याचा कट अंमलात येण्यासाठी प्रयत्न करण्याचा गंभीर आरोप आहे. शिवाय राव यांचे आजारपण हे वृद्धत्वाशी संबंधित असून त्यांना विशेष काळजीची गरज भासल्यास पुन्हा रुग्णालयात दाखल करण्यात येईल. नानावटी रुग्णालयाच्या वैद्यकीय अहवालानुसार राव यांची प्रकृती स्थिर असून त्यांना रुग्णालयात ठेवण्याची आवश्यकता नाही, असा दावा ‘एनआयए’ने केला.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on February 22, 2021 1:38 am