पावसाचा वाढलेला मुक्काम आणि लांबलेली थंडी या वातावरण बदलाचा परिणाम मानवेतर जीवसृष्टीवरही झाला असून देश-परदेशांतून महाराष्ट्रात येणाऱ्या पक्ष्यांचे आगमनही लांबणीवर पडले आहे.

थंडीची चाहूल लागली की महाराष्ट्रातील अनेक मोठय़ा प्रकल्पांच्या परिसरात देश आणि परदेशांतून पक्षी स्थलांतर करतात. जायकवाडी प्रकल्प परिसरात ऑक्टोबरपासूनच वेगवेगळ्या १८० प्रजातींतील पक्षी देश-परदेशांतून हजारोंच्या संख्येने दाखल होतात. मात्र यंदा बहुतांश पक्ष्यांचे आगमन लांबल्याचे चित्र आहे. नोव्हेंबर उजाडला तरीही गुलाबी थंडीची प्रतीक्षा आहे. त्यामुळे पक्षी आगमनाचा हंगामही लांबल्याचे पक्षिमित्रांचे निरीक्षण आहे.

Nandurbar, Heena Gavit,
नंदुरबारमध्ये डॉ. हिना गावित यांच्यासमोर स्वपक्षीय, मित्रपक्षांच्या नाराजीचे आव्हान
Buldhana lok sabha, Buldhana,
बुलढाण्यात पक्षीय उमेदवारांसह अपक्षांचीही अग्निपरीक्षा; मतांचे ध्रुवीकरण, विभाजन ठरणार निर्णायक!
Prime Minister Modi criticism of Rahul gandhi Lalu Prasad Yadav regarding meat
श्रावण महिन्यात मटणावर ताव; पंतप्रधान मोदी यांची राहुल-लालूप्रसाद यांच्यावर टीका
Gaurav Vallabh
अग्रलेख: प्रवक्त्यांची पक्षांतरे!

स्थलांतरित पक्ष्यांमध्ये सर्वसाधारणपणे बदक आणि चिखलात अन्न शोधणाऱ्या पक्ष्यांच्या प्रजाती मोठय़ा प्रमाणात आढळतात. या वेळी त्यांची संख्या मर्यादित आहे. यंदा मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भात काही प्रजातींचे आगमन लांबल्याचे महाराष्ट्र पक्षिमित्र संघटनेचे अध्यक्ष डॉ. जयंत वडतकर यांनी सांगितले.

बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी (बीएनएचएस)चे संचालक डॉ. दीपक आपटे म्हणाले, ‘स्थलांतरित पक्षी आले आहेत, पण लांबलेल्या पावसाळ्यामुळे आणि थंडी म्हणावी तशी नसल्यामुळे त्याचे प्रमाण कमी आहे. अर्थात ते असणे नैसर्गिक आहे, संख्या वाढण्यास थोडा वेळ लागेल.’ बीएनएचएसतर्फे मुंबई परिसरात गेल्या काही दिवसांत ४०० स्थलांतरित पक्ष्यांना रिंगिंग (स्थलांतरित पक्ष्यांचा अभ्यास करण्यासाठी पायांना बांधलेली छोटी रिंग) करण्यात आले आहे, अशी माहितीही डॉ. आपटे यांनी दिली.

मराठवाडय़ातील जायकवाडी प्रकल्पावर दरवर्षी देश-परदेशांतील फ्लेिमगो (रोहित), मोठे फ्लेमिंगो, डक, रॅफ्टर्स पट्टेरी हंग, मत्स्य गरुड आदी १८० प्रजातींतील पक्ष्यांचे आगमन होते. सायबेरिया, लडाख, केरळ, गुजरात येथून हजारोंच्या संख्येने हे पक्षी जायकवाडी परिसरात दाखल होतात. तेथे पक्षिनिरीक्षणासाठी पर्यटकही गर्दी करतात; परंतु यंदा नोव्हेंबर अर्धा सरत आल्यानंतरही बहुतांश पक्ष्यांचे आगमन लांबल्याचे तेथील पक्षिनिरीक्षकांनी सांगितले.

अजूनही थंडीची चाहूल नसल्याने सायबेरिया, लडाख आदी ठिकाणांहून पक्षी आलेले नाहीत. केरळ, कर्नाटकातून येणारे ब्लूईटर यांच्यासह अन्य काही जायकवाडी परिसरात दाखल झाले आहेत; परंतु त्यांची संख्या बोटावर मोजण्याएवढीच आहे, असे पक्षी अभ्यासक, छायाचित्रकार राजेंद्र डुमणे यांनी सांगितले.

नेमके काय घडले?

* दरवर्षी ऑक्टोबरमध्ये पाऊस निरोप घेतो. त्यानंतर ‘ऑक्टोबर हीट’ जाणवते. नोव्हेंबरमध्ये हळूहळू थंडीचे आगमन होते; पण यंदा पावसाचा मुक्काम लांबला.

* दिवाळीतही पाऊस झाला. ‘ऑक्टोबर हीट’ फारशी जाणवली नाही. अरबी समुद्रात निर्माण झालेले कमी दाबाचे क्षेत्र आणि चक्रीवादळांमुळे पाऊस पुन:पुन्हा येत राहिला.

* परिणामी, थंडीचे आगमन लांबले. पक्ष्यांचे आगमन लांबण्यामागे हे एक प्रमुख कारण आहे.

* जायकवाडी प्रकल्प परिसरात दरवर्षी युरोपातून येणाऱ्या मत्स्य गरुडांच्या जोडय़ांचे आगमन.

* गुजरातमधून मोठे फ्लेमिंगोही आले आहेत, पण संख्या तुलनेने कमी.

* सायबेरिया, तिबेट, लडाख येथून येणारे पट्टेरी हंस, फ्लेमिंगोंची प्रतीक्षा.

पक्ष्यांचे आगमन झाले आहे, पण थंडी म्हणावी तशी नसल्याने प्रमाण कमी आहे. चक्रीवादळाचा काही परिणाम झाला आहे का याचा अभ्यास करावा लागेल.

– डॉ. दीपक आपटे, संचालक, बीएनएचएस.

गेल्या आठवडय़ात आम्ही पक्षी सप्ताहाचे आयोजन केले होते. त्यादरम्यान स्थलांतरित पक्ष्यांचे आगमन झाल्याचे आढळले, पण दरवर्षीपेक्षा प्रमाण कमी आहे.

– डॉ. जयंत वडतकर, अध्यक्ष, महाराष्ट्र पक्षिमित्र संघटना .

जायकवाडी, नांदूर-मधमेश्वर, ढेपू जलप्रकल्प तुडुंब आहेत. तुडुंब पाण्यात पक्ष्यांना खाद्य शोधण्यात अडचणी येतात. शेत संपते तेथे पाणवठा असतो. तेथे खाद्य तयार होते. साधारण १५ दिवस ते महिनाभरानंतर पक्ष्यांचे आगमन होईल. थंडीचा मुक्काम लांबेल, परिणामी पक्ष्यांचा मुक्कामही वाढेल.

– राजेंद्र डुमणे, पक्षी अभ्यासक