उन्हाच्या तीव्र झळांनी बेजार झाल्यानंतर पावसाच्या सुखद धारा झेलण्यासाठी आतुर झालेल्यांची सगळी मदार आता फक्त हवामान खात्याच्या अंदाजांवर असते. परंतु जरा सूक्ष्मपणे आपल्या आजूबाजूला जरी डोकावले तरी ‘निसर्गाच्या वेधशाळे’तील अनेक छोटे-मोठे घटक आपल्याला पावसाच्या आगमनाची वर्दी देत असतात.

येत्या काही दिवसांत पाऊस धो-धो कोसळणार या जाणिवेने जंगल सक्रिय होतेच. पण शहरातल्या क्राँक्रीटच्या जंगलातही ही वेधशाळा तितकीच प्रभावीपणे कार्यरत असते हे विशेष! मुंबईतही पावसाला झेलण्याकरिता पक्षी, किडेमुंग्या सक्रिय झाल्या असून काहींची स्थलांतराची व निवारा शोधण्यासाठी धडपड सुरू झाली आहे.

पक्षीच खरेहवामानतज्ज्ञ

पावसाळ्याआधी बहुतांश पक्षी घरटी करतात. पावसाळ्यात मोठय़ा प्रमाणात आढळणारे कीटक पिल्लांच्या खाऊसाठी उपलब्ध असतात. त्यामुळे त्यांना खाण्याची ददात नसते. पाऊस येण्यापूर्वी वाऱ्यांची दिशा तसेच वातावरणीय बदल पक्षी सूचित करतात. यात कोकिळ पक्षी आघाडीवर आहे. कधीच घरटी न बांधणारा कोकिळ पक्षी पावसाआधीच सतर्क होतो. हा पक्षी मैना, कावळा यांच्या घरटय़ात अंडी घालतो. मैना व कावळेदेखील पावसापूर्वीच घरटी बांधतात. यात, ‘कॉमन हॉक ककू’ म्हणजेच ‘पावशा’ या पक्ष्याचा समावेश असतो. त्याच्या ‘पेर्ते व्हा’ या सूचक ओरडण्याने व ‘चातक’ पक्ष्याच्या आगमनाने पावसाची चाहूल लागते.

प्राणीही सतर्क

शेणाने सारवलेल्या जमिनीवर हमखास पावसाआधी वाळवी येते व वाळवीतून किडे बाहेर पडतात. त्यांना नंतर पंखही फुटतात. तर या काळात काळे डोंगळे अन्न साठवण्याच्या शोधात मोठय़ा प्रमाणात बाहेर पडलेले दिसतात. मान्सूनच्या आधी हरिणासारखे प्राणी प्रजनन करतात, जेणेकरून जन्मलेल्या पिल्लांना पावसाळ्यात आलेले लुसलुशीत गवत खाता येईल. मात्र आजच्या पिढीला या गोष्टी भाकडकथा वाटतात, अंधश्रद्धा वाटतात, अशी खंत ‘नेचर फॉरएव्हर सोसायटी’चे संचालक मोहम्मद दिलावर यांनी व्यक्त केली. शेणाने सारवलेल्या जमिनीवर हमखास पावसाआधी वाळवी येते व वाळवीतून किडे बाहेर पडतात. त्यांना नंतर पंखही फुटतात. तर या काळात काळे डोंगळे अन्न साठवण्याच्या शोधात मोठय़ा प्रमाणात बाहेर पडलेले दिसतात. मान्सूनच्या आधी हरिणासारखे प्राणी प्रजनन करतात, जेणेकरून जन्मलेल्या पिल्लांना पावसाळ्यात आलेले लुसलुशीत गवत खाता येईल. मात्र आजच्या पिढीला या गोष्टी भाकडकथा वाटतात, अंधश्रद्धा वाटतात, अशी खंत ‘नेचर फॉरएव्हर सोसायटी’चे संचालक मोहम्मद दिलावर यांनी व्यक्त केली.

सर्वात आधी चाहूल पक्ष्यांना

  • संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात ‘ओरिएन्टेड ड्वार्फ किंगफिशर’ हा ‘खंडय़ा’च्या जातकुळीतला पक्षी सध्या गोवा व दक्षिण भारतातून मुंबईच्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात दिसत असून हा पक्षी पाऊस येण्यापूर्वी स्थलांतर करतो. हे पाऊस येत असल्याचे लक्षण आहे.
  • डोंबिवलीपासून पुढे शेती असलेल्या भागात सध्या ‘वॉटर कॉक’ हा पक्षीदेखील नुकताच पाहण्यात आला आहे. तसेच मुंबईजवळच्या विशेषत: पश्चिम घाटात आढळणारा ‘नवरंग’ हा पक्षी या काळात येथून मध्य भारतात पाऊस येण्याआधी स्थलांतर करतो. या पक्ष्याने स्थलांतराला सुरुवात केली असल्याने पाऊस जवळ आला, असे मानता येऊ शकते. पक्ष्यांच्या अंतर्गत संरचनेतच याचे गुपित लपले असण्याची शक्यता आहे, असे पक्षीतज्ज्ञ अमेय केतकर यांनी सांगितले.
  • उष्णतेच्या काळात लाल ‘गुलमोहोर’ व पिवळा ‘बहावा’ हे बहरलेले असतात. मात्र जेव्हा पावसाची चाहूल लागते तेव्हा हळूहळू हा बहर कमी होतो व यांची फुले झडू लागतात. मात्र याच काळात चिंचेला पालवी फुटू लागते, असे तुषार रोडगे म्हणाले.